‘लहान मेंदूत कचरा साचला की..’, संजय राऊतांनी 'ते' ट्विट केले डिलिट

ठाकरे चित्रपटाच्या स्क्रिनिंग सोहळ्यावेळी झाला वाद

Updated: Jan 24, 2019, 04:26 PM IST
‘लहान मेंदूत कचरा साचला की..’, संजय राऊतांनी 'ते' ट्विट केले डिलिट title=

मुंबई: ठाकरे या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्याशी झालेल्या वादानंतर संजय राऊत यांनी गुरुवारी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये राऊत यांनी म्हटले होते की, ठाकरे The Biopic... लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणी कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते. ठाकरे चित्रपटाचा हाच संदेश आहे. साहजिकच राऊत यांच्या ट्विटनंतर चित्रपट व राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यामध्ये राऊत यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी 'ठाकरे' चित्रपटाचा जाणीवपूर्वक उल्लेख केला आहे. या सगळ्याचा संबंध दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्याशी झालेल्या वादाशी जोडला असता  प्रथमदर्शनी तरी हे ट्विट त्यांनाच उद्देशून असल्याचा अनेकांचा अंदाज आहे. मात्र, काही तासांमध्येच राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हे ट्विट डिलिट केले. एरवी एखादी भूमिका घेतल्यानंतर शिवसेना किंवा संजय राऊत सहजासहजी माघार घेत नाहीत. त्यामुळे राऊत यांनी हे ट्विट काढून टाकण्यामागील खरे कारण काय, यावर नव्याने चर्चा सुरु झाली आहे. 

मुंबईच्या वरळी भागातील अॅट्रिया मॉलमध्ये बुधवारी ठाकरे चित्रपटाचा स्क्रिनिंग सोहळा पार पडला. या सोहळ्याला चित्रपटसृष्टी आणि राजकारणातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. मात्र, अभिजित पानसे आणि संजय राऊत यांच्यात झालेल्या वादामुळे सोहळ्याला गालबोट लागले होते. अभिजित पानसे आपल्या कुटुंबीयांसोबत चित्रपटगृहात आले तेव्हा त्यांच्यासाठी जागा राखून ठेवली नव्हती. यामुळे नाराज झालेले पानसे कुटुंबीयांसोबत आल्यापावली परतले. यावेळी संजय राऊत यांनी त्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्याचा फायदा झाला नाही. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला होता. या व्हीडिओवर परस्परविरोधी प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. दरम्यान, या सगळ्या वादाला राजकीय किनार असल्याचे सांगितले जात आहे.