मुंबई इंडियन्सकडून रिटेन झाल्यावर जसप्रीत बुमराहची पहिली प्रतिक्रिया, रोहित आणि हार्दिक पेक्षा जास्त पैसे मिळाले

मुंबई फ्रेंचायझीने रोहित, हार्दिक या दिग्गज खेळाडूंना वगळून नंबर 1 वर स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला रिटेन केले. यानंतर बुमराहची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

पुजा पवार | Updated: Nov 1, 2024, 06:00 PM IST
मुंबई इंडियन्सकडून रिटेन झाल्यावर जसप्रीत बुमराहची पहिली प्रतिक्रिया, रोहित आणि हार्दिक पेक्षा जास्त पैसे मिळाले  title=
(Photo Credit : Social Media)

Jasprit Bumrah Mumbai Indians : इंडियन प्रीमियर लीगचा 18 वा सीजन सुरु होण्यासाठी आता काहीच महिने शिल्लक असून नोव्हेंबर महिन्यात आयपीएल 2025 (IPL 2025) साठीचं मेगा ऑक्शन होणार आहे. यापूर्वी सर्व फ्रेंचायझींनी गुरुवारी त्यांच्या संघातील खेळाडूंची रिटेन्शन लिस्ट जाहीर केली. मुंबई इंडियन्स या आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रेंचायझीने त्यांच्या संघातील 5 खेळाडूंना रिटेन केलं असून यात बुमराह, रोहित, हार्दिक, सूर्यकुमार आणि तिलक यांचा समावेश आहे. मुंबई फ्रेंचायझीने रोहित, हार्दिक या दिग्गज खेळाडूंना वगळून नंबर 1 वर स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) रिटेन केले. यानंतर बुमराहची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

जसप्रीत बुमराहसाठी मोजले 18 कोटी : 

मुंबई इंडियन्सने प्रथम क्रमांकावर जसप्रीत बुमराहला 18 कोटींना रिटेन करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. बुमराह हा जगातील सर्वात उत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. मुंबईने बुमराहनंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्याला 16.35 कोटी देऊन रिटेन केले. तर रोहित शर्मासाठी 16.30  कोटी तर तिलक वर्मासाठी 8 कोटी मोजले आहेत. 6 पैकी 5 खेळाडूंना रिटेन करून मुंबई इंडियन्सने RTM कार्ड राखून ठेवलं आहे. 

काय म्हणाला बुमराह? 

मुंबई इंडियन्सकडून रिटेन झाल्यावर बुमराह म्हणाला, मला खूप बर वाटतंय. मी या टीममध्ये 19 वर्षांचा युवा म्हणून आलो होतो आणि आता मी 31 वर्षांचा होणार आहे. मला एक मुलगा आहे, त्यामुळे हा संपूर्ण प्रवास खूप खास आहे. मी आनंदी आहे की माझ्या या फ्रेंचायझी सोबतचा प्रवास अजून सुरु आहे आणि यापेक्षा चांगली भावना कोणतीही नाही. जेव्हा मी आलो तेव्हा खेळाचे सर्व दिग्गज इथे होते आणि तुम्हाला माहिती आहे, मी खूप प्रश्न विचारायचो. त्यामुळे आता हळूहळू भूमिका बदलत आहे आणि माझ्यापेक्षा आठ-नऊ वर्षांनी लहान असलेले बरेच तरुण आमच्या टीममध्ये येत आहेत. मला त्यांना मदत करताना नेहमीच आनंद होतो कारण जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मला या दिग्गज खेळाडूंची मदत मिळाली. 

हेही वाचा : MS Dhoni Is Back! चेन्नई सुपरकिंग्सने जाहीर केली रिटेन्शन लिस्ट; धोनी, ऋतुराज सह 'या' खेळाडूंना केलं रिटेन

मुंबई इंडियन्सने 5 वेळा जिंकली चॅम्पियनशिप : 

मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वात 5 वेळा चॅम्पियनशिप जिंकली असून ही टीम आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 या वर्षात आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. बुमराह म्हणाला, 'जिंकण्याची मानसिकता नेहमीच असते कारण तुम्ही जिंकण्यासाठी खेळत आहात. जर तुम्ही फक्त सहभागी होण्यासाठी तिथे असाल, तर ते चांगले नाही. त्यामुळे मला माझ्या क्षमतेवर खूप विश्वास आहे आणि तो नेहमीच असतो. जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला फक्त क्रिकेटर व्हायचे नव्हते, तर मला त्यात अधिक योगदान द्यायचे होते. मला खास गोष्टी करायच्या होत्या. त्यामुळे मी माझ्या ओव्हरकडे सोन्याप्रमाणे  नाही, तर जबाबदारी म्हणून पाहतो'. 

चॅम्पियनशिप कशी जिंकायची हे माहितीये : 

मुंबई इंडियन्सचे होम ग्राउंड आणि फॅन्सबद्दल बोलताना बुमराह म्हणाला की, आम्ही यापूर्वी यशस्वी झालो आहोत आणि आम्हाला विजेतेपद कसं जिंकायचं हे माहितीये. वानखेडेवर खेळण्याचा तो अनुभव नेहमीच छान असतो. तुमच्या पाठीमागे फॅन्सची गर्दी आहे हे जाणवल्यावर बरं वाटतं, स्टेडियमवरचा ऊर्जा आणि उत्साह पाहण्यासारखा असतो.