'The Kashmir Files' चित्रपटाविषयी संजय राऊत यांचं धक्कादायक वक्तव्य

 नुकताच रिलीज झालेल्या 'काश्मीर फाइल्स'ची सर्वत्र चर्चा सुरु आहे, बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने आपला दबदबा कायम ठेवला.

Updated: Mar 20, 2022, 09:49 PM IST
'The Kashmir Files' चित्रपटाविषयी संजय राऊत यांचं धक्कादायक वक्तव्य title=

मुंबई : नुकताच रिलीज झालेल्या 'काश्मीर फाइल्स'ची सर्वत्र चर्चा सुरु आहे, बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने आपला दबदबा कायम ठेवला. 11 मार्च रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने अवघ्या काही दिवसातच चांगलीच कमाई केली आहे आणि लवकरच हा चित्रपट 150 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडू शकेल असं चित्र दिसतंय. परंतु अनेक राजकीय नेते सातत्याने द काश्मीर फाइल्सला विरोध करत आहेत. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊतांनी देखील या चित्रपटाबद्दल वक्तव्य केलं आहे.

संजय राऊत या चित्रपटाबद्दल म्हणाले की, हा चित्रपट काश्मीरवर बनला गेला असला तरी, यातील सत्य लपवण्यात आले आहे आणि या उलट अनेक खोट्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.

काय म्हणाले संजय राऊत?

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "काश्मीरवर चित्रपट बनला आहे, मात्र सत्य लपवण्यात आले आहे आणि अनेक खोट्या गोष्टी देण्यात आल्या आहेत. भाजपने या चित्रपटाचा प्रचार केला आहे, म्हटल्यावर भाजप समर्थकांना तर हा चित्रपट पाहतीलच, आता चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार दिला जाईल, तर चित्रपटाच्या दिग्दर्शकाला पद्मश्री देण्यात येईल."

काश्मिरी पंडित अजून का परतले नाहीत? असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी उपस्थीत केला. संजय राऊत म्हणाले की, ''त्यांना वाय प्लस श्रेणीची सुरक्षा मिळाली आहे. तिथे काश्मिरी पंडितांचे खूप हाल झाले, पंतप्रधानांनी काश्मिरी पंडितांना घरी परतण्याचे आश्वासन दिले होते, मग ते आजपर्यंत का पूर्ण झाले नाही?''

काश्मीर प्रश्नावर राजकारण चांगले नाही

पुढे संजय राऊत म्हणाले की, "काश्मीर हा संवेदनशील मुद्दा आहे, त्यावर राजकारण करणे योग्य नाही. काश्मीर फाईल्स हा फक्त एक चित्रपट आहे, येत्या निवडणुकीत त्याचा कोणाला राजकीय फायदा होईल असे वाटत नाही. निवडणुका येईपर्यंत चित्रपट निघून जाईल."

अनेक भाजपशासित राज्यांमध्ये 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे.