धक्कादायक | नामांकित कंपन्यांच्या नावावर नकली मिठाची विक्री, कुठे घडलाय प्रकार?

 जेवणात जरा कुठे मीठ (Salt) कमी-जास्त झालं की अन्नाची चव बिघडलीच म्हणून समजा.  

Updated: Mar 20, 2022, 09:02 PM IST
धक्कादायक | नामांकित कंपन्यांच्या नावावर नकली मिठाची विक्री, कुठे घडलाय प्रकार? title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : जेवणात जरा कुठे मीठ (Salt) कमी-जास्त झालं की अन्नाची चव बिघडलीच म्हणून समजा. मिठामुळे जशी अन्नाला चव येते, तितकंच ते आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. त्यामुळेच अलिकडे आयोडिनयुक्त मिठाची मागणी वाढलीय. मात्र याच मिठाआडून तुमच्या जेवणात विष कालवण्याचा प्रकार सुरू झालाय. (mumbai police raids in versova and seized 4 thousand 500 kg fake salt) 

मुंबईत शुद्ध मिठाच्या नावावर चक्क बँडेड कंपन्यांच्या पाकिटांमधून नकली मिठाची विक्री होत असल्याचा प्रकार उघड झालाय. मुंबई पोलिसांनी वर्सोव्यात छापा टाकून मिठाच्या काळ्याबाजाराचा पर्दाफाश केलाय. इथल्या एका गोदामातून साडेचार हजार किलो बोगस मीठ जप्त करण्यात आलंय.

हे नकली मीठ खाल्ल्यानं महिला आणि लहान मुलांना थायरॉईडच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. नकली मिठात आयोडीन नसल्यानं हे मीठ गर्भवती मातांसाठी हानीकारक आहे. त्यामुळे नवजात बाळावर त्याचे गंभीर परिणाम दिसू शकतात. बऱ्याचदा नकली मीठात गन पावडर मिसळली जाते. त्यामुळे या मिठाचं सेवन शरीरासाठी घातक ठरू शकतं.

मीठ हा आपल्या रोजच्या आहारातला पदार्थ आहे. त्यामुळे नकली मीठ कसं ओळखायचं हे देखील प्रत्येकानं जाणून घ्यायला हवं.

नकली मीठ कसं ओळखाल?

बटाटा आणि लिंबाच्या मदतीनं असली-नकली मिठातील फरक ओळखा. सर्वात आधी बटाटा कापून त्यावर मीठ टाका. मिनिटभर मीठ तसंच राहू द्या. त्यानंतर त्यावर लिंबाच्या रसाचे दोन थेंब टाका. जर बटाट्याचा रंग निळा झाला तर ते मीठ बनावट मीठ आहे असं समजा. बटाट्याचा रंग बदलला नाही तर ते अस्सल मीठ समजावं.

पैशांच्या लालसेपोटी माफियांकडून हा नकली मीठाचा गोरखधंदा सुरूंय. मात्र तुम्ही अशा भेसळखोरांपासून सावध राहा.. कारण सवाल तुमच्या आमच्या आरोग्याचा आहे. नाहीतर आपल्या आयुष्यात कायमस्वरूपी मिठाचा खडा पडेल.