शिवसेनेकडून राहुल गांधींची पाठराखण, मोदींना दिलं आव्हान

'मोदींनी राहुल यांचं हे वक्तव्य 'घमेंड' म्हणून घेत त्याची खिल्ली उडवणं योग्य नाही'

Updated: May 9, 2018, 09:23 PM IST
शिवसेनेकडून राहुल गांधींची पाठराखण, मोदींना दिलं आव्हान title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा 'उपहास' उडवू नये, असा सल्ला शिवसेनेनं बुधवारी भाजपला आणि पंतप्रधानांना दिलाय. राहुल गांधी यांनी 2019 मध्ये बहुमत मिळण्याच्या स्थितीत पंतप्रधान बनण्याची घोषणा केलीय. मोदींनी राहुल यांचं हे वक्तव्य 'घमेंड' म्हणून घेत त्याची खिल्ली उडवणं योग्य नाही, असं शिवसेनेचे राज्यसभा सदस्य आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटलंय. लोकशाहीत काँग्रेस अध्यक्षांनाही पंतप्रधान बनण्याची आपली इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे, असंही त्यांनी म्हटलंय. 

याच अधिकारानं मोदी देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. यामुळे त्यांनी इतरांची टर उडवू नये. वास्तवात 2014 मध्ये लालकृष्ण अडवाणी पंतप्रधान बनतील अशी शक्यता होती, असंही राऊत यांनी म्हटलंय. 

राहुल गांधींना पंतप्रधान बनण्यापासून रोखायचं असेल तर त्यांच्यासमोर राहुल गांधींना निवणुकीत हरवणं हाच उत्तम पर्याय आहे... त्यांच्या वक्तव्यावर त्यांची टर उडवण्याला काहीही अर्थ नाही... असं म्हणत पंतप्रधानांनी राहुल गांधींना हरवून दाखवावं, असं आव्हानंच शिवसेनेनं पंतप्रधानांना दिलंय. 

काँग्रेस आजही देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. 2014 मध्ये निर्माण झालेल्या एका असाधारण वातावरणामुळे या पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. यूपीएत सहभागी असलेल्या घटकांना आता निर्णय घ्यायचाय की राहुल गांधी यांची भूमिका काय असेल?, असंही राऊत म्हणाले.

शरद पवार हेदेखील पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार आहेत, असं आम्हाला वाटतं... आणि भाजपमध्ये मोदींशिवाय अरुण जेटली आणि आडवाणी यांचीही शक्यता आहे, असंही राऊत म्हणतात.