आदित्य ठाकरेंनी मैदानांची मागणी फेटाळल्यावर संजय राऊतांची सारवासारव

आदित्य ठाकरेंनी फेटाळली संजय राऊत यांची मागणी

Updated: May 17, 2020, 06:16 PM IST
आदित्य ठाकरेंनी मैदानांची मागणी फेटाळल्यावर संजय राऊतांची सारवासारव title=

मुंबई : वानखेडे स्टेडियमप्रमाणेच ब्रेबॉर्न स्टेडियममध्येही कोरोना केयर सेंटर उभारण्यात यावं अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. आदित्य ठाकरेंनी या मागणीला नकार दिल्यानंतर आता संजय राऊत यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

'वानखेडे तसंच ब्रेबॉर्न सारख्या क्रिकेट मैदानावर कोरोना रुग्णांसाठी इस्पितळे उभारली जाणार नाहीत, ही उद्धव ठाकरेंची भूमिका योग्यच आहे. वानखेडे कोरोना रुग्णांसाठी घेणार, असं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. वानखेडे वापरात आहे, ब्रेबॉर्न रिकामे आहे इतकेच. मैदाने वाचवायलाच हवीत,' असं ट्विट संजय राऊत यांनी केलं.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?

'संजयजी आपण खेळाची मैदाने कोरोना केअर सेंटरसाठी वापरू शकत नाही. कारण, याठिकाणी माती आहे. त्यामुळे पावसाळ्यात याठिकाणी मोठ्याप्रमाणावर चिखल होऊन अडचणी वाढतील. त्यामुळे आपण कोरोना सेंटरसाठी काँक्रिट बेस किंवा ठोस पाय असलेल्या मोकळ्या जागांच्या शोधात आहोत', असे आदित्य यांनी सांगितले.

दुसरीकडे नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे यांनी या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 'आई शप्पथ यांना वेड लागलंय. संजय राऊत म्हणतात ग्राऊंड ताब्यात घ्या, आदित्य ठाकरे म्हणतात पाऊस येतोय बेड भिजतील. हे असले राज्यकर्ते आपलं काय भलं करणार?' असा प्रश्न निलेश राणेंनी उपस्थित केला आहे. 

दरम्यान, वानखेडे स्टेडियमच्या परिसरातील नागरिकांनीही पालिकेच्या या संभाव्य निर्णयाला विरोध केला होता. वानखेडेच्या परिसरात मोठ्याप्रमाणावर ज्येष्ठ नागरिक राहतात. कोरोना सेंटरमुळे त्यांच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो. त्याऐवजी सरकारने या परिसरातील खाली असलेल्या इमारतींमध्ये कोरोनाग्रस्तांच्या उपचाराची सोय करावी, असे या रहिवाशांचे म्हणणे होते. मात्र, आता पालिकेनेही वानखेडेवर कोरोना सेंटर न उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा प्रश्न निकाली निघाला आहे.