"राहुल गांधींवर टीका करणाऱ्यांनी चार दिवस..."; राज ठाकरेंच्या मिमिक्रीला संजय राऊतांचे प्रत्युत्तर

राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचे आहेत. हल्ली राहुल गांधी बोलतात की त्यांच्या मागे आर.डी. बर्मन बोलतात हेच समजत नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी रविवारी केली होती

Updated: Nov 28, 2022, 10:52 AM IST
"राहुल गांधींवर टीका करणाऱ्यांनी चार दिवस..."; राज ठाकरेंच्या मिमिक्रीला संजय राऊतांचे प्रत्युत्तर title=

Raj Thackeray : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी गटाध्यक्षांचा मेळावा घेत महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या राजकारणावरुन सडकून टीका केली आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रातील राजकारणाचा दर्जा खालावत असून महिला नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका, जाती-पातीचे विष कालवले जात आहे. देश पातळीवरही राष्ट्रपुरुषांची सुरू असलेली बदनामी भाजप-काँग्रेसने त्वरित थांबवावी, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. यावेळी राज ठाकरेंनी स्वार्थ आणि पैशांसाठी आपण कधी विचारांशी प्रतारणा केली नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंवरही (Uddhav Thackeray) टीका केली. तसेच भारत जोडो यात्रेनिमित्त महाराष्ट्रात आलेल्या राहुल गांधी (Rahul Gnadhi) यांच्यावरही मिमिक्रीच्या माध्यमातून राज ठाकरेंनी (raj thackeray mimicry) टीका केली.

'महापुरुषांची बदनामी केली जात आहे. त्या दिवशी राहुल गांधी महाराष्ट्रात आले होते. ते गुळगुळीत मेंदूचे आहेत. हल्ली राहुल गांधी बोलतात की त्यांच्या मागे आर.डी. बर्मन बोलतात हेच समजत नाही. अरे गधड्या सावरकरांबद्दल बोलायची तुझी लायकी आहे का?' असा सवाल राज ठाकरे यांनी केला. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे.

मिमिक्री पाहायची असेल तर जॉनी लिव्हरची पाहू - संजय राऊत

"राजकारण हे मिमिक्री नाही. आम्हाला मिमिक्री, नाट्याभिनय पाहायचा असेल तर आम्ही जॉनी लिव्हरची पाहू. आवाज काढणं आता खूप झालं. आता आपण परिपक्व झालेला आहात. थोडा महाराष्ट्र पाहा. उद्धव ठाकरेंवर टीका करून तुमचा राजकारण किती काळ चालणार? काही संघटनात्मक काम करा. आमच्यावर एवढी संकटे असतानाही आमचा पक्ष लढतोय. राहुल गांधी यांनी ज्याप्रकारचे कष्ट घेतले आहेत. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी चार दिवस घेऊन दाखवावेत," असे संजय राऊत यांनी म्हटले.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

"काल-परवा मुख्यमंत्री पदावर असलेले आणि आता बाहेर पडले. मुख्यमंत्री पदावर असताना ते तब्येतीचं कारण सांगून बाहेर पडत नव्हते. एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली आणि आता ते सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखं वागणाऱ्यामधला मी नाही. स्वत:चा स्वार्थ आणि पैशांसाठी दिसेल त्याचा हात धरायचा आणि बागेमध्ये कोपऱ्यात जाऊन बसायचं, हे असले धंदे मी करत नाही. मराठी किंवा हिंदुत्वाच्या मुद्यावर उद्धव ठाकरेंवर एकतरी गुन्हा दाखल आहे का? त्यांनी कधी भूमिकाच घेतली नाही, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही. फक्त स्वार्थासाठी आणि पैशांसाठी सगळ्या गोष्टी करायच्या, अशी टीका राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केलीय.