मुंबई : CBIनं कीर्ती केडियांच्या ट्रान्सकॉन कंपनीवर छापे टाकले होते. याच कंपनीकडून नवनीत राणांनी दीड कोटीचं कर्ज घेतल्याचं ट्विट संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं होतं. यासाठी नवनीत राणांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राचा आधार राऊतांनी घेतला होता. मात्र संजय राऊतांनी दोन वेळा हे ट्विट केलं आणि दोन्ही वेळा डिलीट केलं.
दुसरीकडे राणा दाम्पत्याच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होते आहे. आता दाऊद गँगशी नवनीत राणांचे आर्थिक व्यवहार असल्याचा गंभीर आरोप झाला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करण्याची शक्यता आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी नवनीत राणांचे थेट अडरवर्ल्ड डॉन दाऊद गँगसोबत संबंध असल्याचा खळबळजनक आरोप केला. डी गँगच्या जवळ असलेल्या युसूफ लकडावालाकडून राणांनी 80 लाखांचं कर्ज घेतल्याचा आरोप राऊतांनी केलाय. निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नवनीत राणांनी लकडावालाकडून घेतलेल्या कर्जाचा उल्लेख केल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे हे प्रकरण देशाच्या सुरक्षेशी संबंधित असून आता ईडी तपास करणार का, असा सवाल संजय राऊतांनी केलाय.
राणांना कथितरित्या कर्ज देणारा लकडावाला डी गँगचा फायनान्सर असल्याचं बोललं जातं. युसूफ लकडावाला हा मुंबईतला एक प्रसिद्ध बिल्डर होता. पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपात ईडीनं त्याला अटक केली होती. 2019 मध्ये आर्थिक गुन्हे शाखेनंही त्याला अटक केली होती. जमीन खरेदीच्या कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप त्याच्यावर होता. तो दाऊदचा निकटवर्ती होता आणि त्याचे मुंबईतील आर्थिक व्यवहार सांभाळत होता, असंही बोललं जातं. आर्थर रोड जेलमध्ये असताना कॅन्सरमुळे त्याचा मृत्यू झाला.
हनुमान चालिसावरून निर्माण झालेल्या वादानंतर राणा दाम्पत्याला अटक झाली आणि त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्याची मालिका सुरू झालीये.