ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पदमभूषण शिवाजीराव गिरधर पाटील यांचे निधन

सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी खासदार, माजी मंत्री पदमभूषण शिवाजीराव गिरधर पाटील यांचे निधन झालंय. मुंबईतल्या लिलावती हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  

Updated: Jul 22, 2017, 04:37 PM IST
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पदमभूषण शिवाजीराव गिरधर पाटील यांचे निधन  title=

मुंबई : सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी खासदार, माजी मंत्री पदमभूषण शिवाजीराव गिरधर पाटील यांचे निधन झालंय. मुंबईतल्या लिलावती हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९२ वर्षांचे होते. 

गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. शुक्रवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागले. पहाटे चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचे ते वडील होते. त्यांचं संपूर्ण कुटुंब स्वातंत्र्य लढ्यातही सहभागी झाले होते. 

या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. स्वातंत्र्यानंतर ते प्रजा समाजवादी पक्षात काम करू लागले. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या आग्रहाने ते काँग्रेसमध्ये गेले. आमदार, मंत्री, राज्यसभा खासदार अशी विविध पदं त्यांनी भूषवली. 

सहकार क्षेत्रातही त्यांचं मोलाचं योगदान होतं. १९८२ मध्ये त्यांनी शिरपूर साखर कारखान्याची स्थापना केली. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे निकटवर्तीय सल्लागार म्हणून ते ओळखले जात.