#ModiSarkar2: मोदी सरकारच्या शपथविधीनंतर शेअर बाजारात मोठी उसळी

डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भावही वधारला आहे.

Updated: May 31, 2019, 10:21 AM IST
#ModiSarkar2: मोदी सरकारच्या शपथविधीनंतर शेअर बाजारात मोठी उसळी title=

मुंबई: मोदी सरकारच्या गुरुवारी पार पडलेल्या शपथविधीनंतर दुसऱ्याच दिवशी शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शुक्रवारी बाजार उघडताच सेन्सेक्सने २०० अंकांची उसळी घेत ४० हजारांचा टप्पा ओलांडला. तर निफ्टीनेही १२ हजारांची पातळी गाठली. यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थितीही भक्कम झाली आहे. रुपयाचे मूल्य प्रतिडॉलर ६९.७६ इतके झाले आहे. 

या सगळ्या व्यवहारांमध्ये कोल इंडिया, भारती एअरटेलच्या समभागांनी सर्वाधिक कमाई केली. या दोन्ही कंपन्यांच्या समभागांची किंमत तब्बल २ टक्क्यांनी वाढली आहे.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या महाविजयानंतर मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली. यामध्ये २४ कॅबिनेट मंत्री, ९ स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. मोदींच्या मंत्रिमंळात ५७ मंत्र्यांचा समावेश झाला असला तरी अजून खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे कोणत्या मंत्र्यांना बढती मिळणार त्यातही अतिमहत्त्वाच्या संरक्षण, अर्थ, गृह आणि परराष्ट्र खात्याची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर सोपवली जाईल याची उत्सुकता कायम आहे.