शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळला

निफ्टी देखील गडगडला 

Updated: Mar 9, 2020, 09:47 AM IST
शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळला  title=

मुंबई : कोरोना व्हायरस आणि यस बँकेचा फटका शेअर बाजाराला बसला आहे. शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स तब्बल 1100 अंकांनी कोसळला आहे. तसेच निफ्टी देखील गडगडला असल्याचं चित्र समोर आलं आहे. 

शनिवार आणि रविवारच्या सुट्टीनंतर शेअर बाजार सोमवारी उघडला. पण शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली असून निफ्टी 280 अंकांनी गडगडला आहे. सोमवारची सुरूवात अतिशय मोठ्या घसरणीने झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना मोठा फटका बसणार आहे. 

करोना व्हायरसमुळे आधीच शेअर बाजारात निरुत्साह असताना, येस बँकेवर आरबीआयने निर्बंध लादले त्यामुळे शुक्रवारी बाजार आणखी गडगडला. शुक्रवारी 856.65 अंकांनी घसरण झाल्याची पाहायला मिळाली. यस बँकेचे शेअर्स अगदी सुरूवातीपासूनच 15 टक्के कमी दरात होते. 

आता सौदी अरेबियाने तेल बाजारपेठेला मोठा धक्का दिला आहे. एकेकाळचा सहकारी असलेल्या रशिया विरोधात सौदी अरेबियाने दर युद्ध सुरु केले आहे. त्यामुळे तेलाच्या किंमतीमध्ये ऐतिहासिक घसरण झाली आहे.

शेअर बाजारात सणाच्या तोंडावरच झालेली मोठी घसरण गुंतवणूकदारांना मोठा फटका देऊ शकते. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह कमी झाला आहे.