'अडीच वर्ष राज्यमंत्री पण...' शंभूराज देसाई यांचा गौप्यस्फोट

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय का घेतला? शंभूराज देसाईंनी सांगितलं कारण

Updated: Jun 27, 2022, 05:27 PM IST
'अडीच वर्ष राज्यमंत्री पण...' शंभूराज देसाई यांचा गौप्यस्फोट title=

Maharashtra Political Crisis : सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) मविआ (Mahavikas Aghadi Government) सरकारला मोठा झटका दिलाय. उपाध्यक्षांनी 16 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी बजावलेल्या नोटीसीला उत्तर देण्यासाठी 12 जुलैपर्यंत मुदत वाढवून दिलीय. तसंच उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zilwal), शिवसेनेचे नवनियुक्त गटनेते अजय चौधरी (Ajay Choudhari) आणि मुख्य प्रतोद सुनील प्रभूंसह (Sunil Prabhu) केंद्र सरकारला नोटीस बजावलीय. या नोटीशीला पुढील पाच दिवसांत उत्तर देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. आता या प्रकरणावरील पुढील सुनावणी 11 जुलैला होणार आहे. 

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला असतानाच आता शंभूराज देसाई यांनीही मविआवर गंभीर आरोप केले आहेत. गेली अडीच वर्षे आम्ही राज्यमंत्री फक्त नावालाच होतो, आम्हाला काहीच अधिकार नव्हते. अडीच वर्षात कॅबिनेट मंत्री - राज्यमंत्री अधिकार वाटप देखील झाले नाही असा आरोप शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केला आहे.

राज्यमंत्री असून देखील आम्हाला आमच्या मतदारसंघात फंड मिळत नव्हता. याउलट आम्ही पराभूत केलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराना उपमुख्यमंत्री अजित पवार ताकद देत होते. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे यासंदर्भांत वारंवार तक्रारी करूनही कधीही कारवाई झाली नाही, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरड इथल्या समाधी स्थळ परिसराचा विकास करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिथल्या कार्यक्रमात शब्द दिला होता. अर्थ आणि वित्त राज्य मंत्री नात्याने या निर्णयाची मी विधानपरिषदेत घोषणा केली होती. यासाठी 5 कोटी रुपये निधी तरतूद करण्याची शिफारस अर्थराज्य मंत्री या नात्याने मी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.

मात्र वारंवार पाठपुरावा करून देखील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळ विकासासाठी 5 कोटी रुपये देखील मंजूर करण्यात आले नाहीत. आम्हा राज्यमंत्र्याची ही अवस्था असेल तर आमदारांच्या बाबतीत काय परिस्थिती असेल याचा आपण विचार करा, म्हणूनच एक स्पष्ट भूमिका घेण्याची विनंती आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत येण्याचा हा निर्णय घेतला असं सांगत शंभूराजे देसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

आमची ही भूमिका शिवसेनेच्या हिताचीच असून सर्वसामान्य शिवसैनिकांनी देखील ती समजून घ्यावी अशी माझी त्यांना विनंती असल्याचं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.

शंभूराज देसाईंविरोधात उद्धव ठाकरे समर्थक आक्रमक
दरम्यान, शिवसेनेमधील आमदारांच्या बंडा नंतर शिवसैनिक आक्रमक झाले असून आज वाशिमचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोस्टरला शिवसैनिकानी काळे फासलं. यावेळी जिल्ह्यातील शिवसैनकांनी शंभूराज देसाई यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत निषेध केला.