मुंबई: राज्य सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सरकारवर उपरोधिक शब्दांत निशाणा साधला. मी सरकारचं अभिनंदन करतो, असे त्यांनी म्हटले.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 'ईडी'कडून करण्यात आलेल्या या कारवाईनंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी 'झी २४ तास'शी संवाद साधताना म्हटले की, मी कधीही राज्य सहकारी बँकेचा सभासद किंवा संचालक नव्हतो. तसेच बँकेच्या आर्थिक देवाणघेवाणीतही माझा कोणताही संबंध नव्हता. याचिकेत केवळ संबंधित लोक शरद पवार यांच्या विचाराचे होते, असा उल्लेख होता. यावरून माझ्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे.
एखाद्या पक्षप्रमुखाविरोधात गुन्हा दाखल करणारे हे पहिलेच सरकार आहे. यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो, असा खोचक टोला शरद पवारांनी यावेळी लगावला.
विधानसभा निवडणुकीची वेळ साधून सरकारकडून जाणीवपूर्वक ही कारवाई करण्यात आल्याचा अप्रत्यक्ष आरोपही पवार यांनी केला. माझ्या राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला टप्पा नुकताच पार पडला. या दौऱ्याला सामान्य जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अशी काहीतरी कारवाई होणार, याची शंका मला होतीच. आता 'ईडी'ने गुन्हा दाखल केल्यामुळे ही शंका खरी ठरली आहे. राज्यातील जनता हे सर्व पाहत आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.
यावेळी शरद पवारांनी 'ईडी'च्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात उच्च न्यायालयाचा निर्णय कायम न ठेवता पुन्हा निपक्षपातीपणे चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, 'ईडी'ने चौकशीपूर्वीच गुन्हा दाखल केला, याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
तसेच माझ्या माहितीनुसार राज्य सहकारी बँकेने काही निर्णय या अडचणीत सापडलेल्या संस्थांना सावरण्यासाठी घेतले होते. याशिवाय, संस्थांना देण्यात आलेल्या बहुतांश कर्जाची वसुली झाल्याचेही पवारांनी सांगितले.