जनतेच्या पाठिंब्यावर निवडून आलेले पळपुटे निघाले; शरद पवारांचा उदयनराजेंवर निशाणा

पक्ष बदल हा स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी केला आहे, जनतेच्या विकासासाठी नव्हे.

Updated: Sep 15, 2019, 03:34 PM IST
जनतेच्या पाठिंब्यावर निवडून आलेले पळपुटे निघाले; शरद पवारांचा उदयनराजेंवर निशाणा title=
संग्रहित छायाचित्र

नवी मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेल्या उदयनराजे भोसले यांच्यावर रविवारी शरद पवार यांनी निशाणा साधला. ते रविवारी नवी मुंबईतील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी शरद पवारांनी म्हटले की, सामान्य जनतेच्या पाठिंब्यावर आलेले पळपुटेपणाची भूमिका घेत असतील, तर लोकच त्यांचा समाचार घेतील. पवारांनी थेट उल्लेख केला नसला तरी त्यांच्या या विधानाचा रोख उदयनराजेंच्याच दिशेने असल्याचे सांगितले जाते. 

तर काही दिवसांपूर्वी उदयनराजेंची समजूत काढायला गेलेल्या अमोल कोल्हे यांनीही उदयनराजेंवर तोफ डागली. उदयनराजे यांनी पक्ष बदल हा स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी केला आहे, जनतेच्या विकासासाठी नव्हे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले. 

'राष्ट्रवादीत १५ वर्षे खूप सहन केले'

भाजपा प्रवेश केल्यावर उदयनराजेंनी सर्वप्रथम झी २४ तासला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले. राष्ट्रवादीत १५ वर्षे खूप सहन केले. आघाडी सरकार असताना मतदारसंघात कामे झाली नाहीत, अशी तोफ उदयनराजेंनी डागली. शिवेंद्रराजे आणि आपल्यात खटके उडत नव्हते. तर काहीजणांकडून उडवले जात होते. आता खटके उडवणारेच आमच्यासोबत नाहीत, असा घणाघाती आरोप उदयनराजेंनी केला. 

साताऱ्यात उदयनराजेंविरोधात कोण उतरणार रिंगणात?

उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीबरोबर साताऱ्याची पोटनिवडणूक पार पडण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती. मात्र, चव्हाणांनी हा प्रस्ताव नाकारला. यानंतर सध्या शिवसेनेत असलेले माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे नरेंद्र पाटील यांच्या पुढील भूमिकेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.