शरद पवार २७ तारखेला ईडीच्या कार्यालयात जाणार

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला.

Updated: Sep 25, 2019, 03:56 PM IST
शरद पवार २७ तारखेला ईडीच्या कार्यालयात जाणार title=

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. २७ सप्टेंबरला दुपारी २ वाजता मी ईडीच्या कार्यालयात जाणार आहे आणि त्यांना संपूर्ण माहिती देणार आहे, तसंच त्यांचा पाहुणचारही घेणार आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत. तपासयंत्रणेला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं.

'दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकणार नाही, आमच्यावर शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत. मी संविधान मानणारा आहे,' असं शरद पवार म्हणाले. आता संपूर्ण महिना निवडणूक प्रचारासाठी वेळ देणार आहे, त्यामुळे मी मुंबईबाहेर राहणार आहे. ईडीला मला काही प्रेमाचा संदेश पाठवायचा असेल आणि मी उपलब्ध नाही, असं व्हायला नको, म्हणून मी ईडीच्या ऑफिसमध्ये जाणार असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं.

'माझ्या आयुष्यातील गुन्हा दाखल व्हायचा हा दुसरा प्रसंग आहे. याआधी १९८० साली शेतकरी प्रश्नावर दिंडी काढली होती तेव्हा जळगावमध्ये माझ्यावर गुन्हा दाखल झाला होता,' ही आठवण पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितली.

मी कुठल्याही बँकेचा संचालक नव्हतो, पण शिक्षण संस्था किंवा सहकारी संस्थेचे प्रश्न माझ्याकडे आले की मी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करतो, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

राज्य सहकारी बॅंकेचा २५ हजार कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचे ईडीने म्हटले आहे. सहकारी बँकेचे आर्थिक स्थितीत कमकुवत असतानाही सहकारी साखर कारखान्यांना कर्ज मंजूर करण्यात आले. कर्ज वाटप करताना मोठ्या प्रमाणावर अनियमितता होती, असा ठपका ईडीने ठेवला आहे. दरम्यान, सहकारी साखर कारखाने काही विशिष्ट राजकारण्यांच्या जवळच्या नातेवाईकांना विकल्या गेल्याचा दावाही ईडीने केलाय.