दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : महाविकासआघाडीमध्ये सुरू असलेल्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. आज संध्याकाळी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. महाविकासआघाडीतल्या नाराजीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. तसंच लॉकडाऊनबाबतही दोघांमध्ये संवाद होईल.
लॉकडाऊनबाबत प्रशासनातील अधिकारी मंत्र्यांशी चर्चा न करताच निर्णय घेत असल्याची तक्रार महाविकासआघाडीच्या नेत्यांची आहे. लॉकडाऊनचा निर्णयही परस्पर जाहीर करण्यात आल्यामुळे मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. त्याबद्दलच पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
त्याआधी काल संध्याकाळी अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊन आणि राज्याच्या आर्थिक प्रश्नांवर चर्चा झाली. महाविकासआघाडीतल्या कुरबुरींवरही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. परस्पर लॉकडाऊन वाढवल्याबाबत पवारांनी फोनवरुन मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक पार पडली.