२५ वर्षे बोरं चाखली, आता शड्डू ठोकत असाल तर आव्हान स्वीकारले - महापौर पेडणेकर

 राजाचा जीव पोपटात आहे तर मग तुमचा जीव नक्की कशात अडकलाय असा सवाल महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी भाजप (BJP) ला केला .

Updated: Nov 19, 2020, 03:23 PM IST
 २५ वर्षे बोरं चाखली, आता शड्डू ठोकत असाल तर आव्हान स्वीकारले - महापौर  पेडणेकर title=
संग्रहित छाया

मुंबई : ज्यांनी मुंबई महानगरपालिकेत (Mumbai Municipal Corporation) आमच्यासोबत २५ वर्षे बोरं चाखली तोच पक्ष शड्डू ठोकत असेल तर आम्ही आव्हान स्वीकारले, असे महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी म्हटले आहे. राजाचा जीव पोपटात आहे तर मग तुमचा जीव नक्की कशात अडकलाय असा सवाल त्यांनी भाजपला केला. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी स्वबळावर भाजपचा झेंडा फडकविण्याची घोषणा केली. त्याला शिवसेनेने  (Shiv sena) जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, अतुल भातखळकर यांच्यावर मुंबईची जबाबदारी असेल तर मग आशिष शेलार काय करणार?, शेलारांच्या नेतृत्वात मागील निवडणूक लढली होती. त्यांचा अभ्यासही चांगला आहे, मग नेतृत्व बदल का?, मुंबई  (Mumbai) भाजपतअंतर्गत (BJP) वाद दिसत आहे, असा टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला.  

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून अतुल भातखळकर यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली. भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर भाजपचा महापौर निवडून आणू असा विश्वास अतुल भातखळकरांनी व्यक्त केला आहे.