मुंबई : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. उद्धव ठाकरे आज सेना भवनात दाखल झाले. शिवसेनेतून एक मोठा गट फुटल्याने नव्याने पक्षबांधणी करण्याचं आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं. आता मी पुन्हा एकदा शिवसेना भवनात जायला सुरुवात करणार असून शिवसैनिकांना भेटणार आहे. शिवसेनेची नवीन वाटचाल सुरु करणार आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. उद्धव ठाकरे आज सेनाभवनात दाखल झाले. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर उद्दव ठाकरेंनी बैठकांचा सपाटा लावलाय. आज त्यांनी सेनाभवनात महिला आघाडीतल्या प्रमुख महिला नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली.
काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती त्याला ब्रेक नव्हता सुसाट सुटला होता, असे टोले उद्धव ठाकरेंनी मारले. एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन होतं अपघात तर होणार नाही. काल उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचा माईक खेचलाय पुढे काय काय खेचतील ते माहीत नाही, असं उद्दव ठाकरे म्हणाले.
खासदार संजय राऊत,अरविंद सावंत,सुभाष देसाई, शिवाजीराव आढळराव पाटील, आदेश बांदेकर, किशोरी पेडणेकर या बैठकीसाठी उपस्थित होते.