बाळासाहेबांचे हिंदुत्व पेलणे येरागबाळ्याचे काम नव्हे; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला

शिवसेना एक झेंडा, एक नेता घेऊन पंचावन्न वर्षे काम करत आहे.

Updated: Jan 25, 2020, 08:36 AM IST
बाळासाहेबांचे हिंदुत्व पेलणे येरागबाळ्याचे काम नव्हे; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला title=

मुंबई: भविष्यात हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन राजकारण करण्याचा इरादा जाहीर करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शिवसेनेने टीकास्त्र सोडले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येरागबाळ्यांचा खेळ नव्हे. त्यामुळे ही गोष्ट झेपत असेल तरच पुढे जा, असा सल्ला राज ठाकरे यांना 'सामना'तून देण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वीच मुंबईत मनसेचे अधिवेशन पार पडले होते. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या नव्या भगव्या झेंड्याचे अनावरण केले होते. तसेच आपल्या भाषणात पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना देशातून हाकलवून लावण्याचा राग आळवून राज यांनी भविष्यातील आपल्या हिंदुत्ववादी राजकारणाची दिशा स्पष्ट केली होती. 

राज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात मराठी बांधवानो,... अशी झाली नाही तर..

राज यांच्या या भूमिकेचा 'सामना'च्या अग्रलेखातून चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. मनसेच्या अधिवेशनातील राज ठाकरे यांचे भाषण म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची 'कॉपी' होती. त्यामध्ये मंदिराच्या आरत्या, मुसलमानांचे नमाज, बांगलादेशींची हकालपट्टी हे विषय जसेच्या तसे आले होते. तुमचा विचार 'उसना'च असला तरी तो हिंदुत्वाचा आहे. त्यासाठी आम्ही तुमचे स्वागत करतो. मात्र, बाळासाहेबांचे हिंदुत्व पेलवणे हे काही येरागबाळ्याचे काम नाही. त्यामुळे हे झेपणार असेल तरच पुढे जा, असा खोचक टोला राज ठाकरे यांना लगावण्यात आला आहे. 

मनसेच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर शिक्कामोर्तब; व्यासपीठावर सावरकरांचा फोटो

तसेच राज ठाकरे यांना पडद्यामागून पाठिंबा देणाऱ्या भाजपवरही अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. शिवसेनेने रंग बदलला अशी भाषा करणाऱ्यांनी स्वत:च्या चेहऱ्यावरील मुखवटे आणि चेहऱ्यावरचा अनेक रंगी मेकअप तपासून घ्यायला हवा. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलवून लावण्यासाठी राज ठाकरे यांनी मोर्चा काढण्याची केलेली घोषणा ही प्याद्यांना कुणीतरी हलवत असल्याचे द्योतक आहे. शिवसेनेच्या बाबतीत पोटदुखी हा प्रकार येथे आहेच. भाजपची शिवसेनाद्वेषाची मूळव्याध दुसऱ्या मार्गातून बाहेर येत आहे. त्यांचे हे खेळ जुनेच आहेत, अशी टीका शिवसेनेने केली आहे.