मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण; शिवसेनेचा 'सामना'तून भाजपवर निशाणा

Shiv Sena on BJP Government: शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून पुन्हा एकदा केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.  

Updated: Jun 6, 2022, 10:31 AM IST
मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण; शिवसेनेचा 'सामना'तून भाजपवर निशाणा  title=

मुंबई : Shiv Sena on BJP Government: शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून पुन्हा एकदा केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. एकीकडे देशातील जनता समस्यांमुळे होरपळत आहे, तर दुसरीकडे देशाचा राजा आपल्या कार्यकाळाला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जल्लोषात मग्न असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. सामनाच्या अग्रलेखातून आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली. उत्सवी राजा तळमळे प्रजा या अग्रलेखातून ही टीका करण्यात आलीय. काश्मिरी पंडितांचं पुन्हा हत्याकांड सुरु झाले असताना मोदी शाह केंद्रात सरकारची 8 वर्षे साजरी करण्यात मश्गूल आहेत अशी टीका 'सामना'तून करण्यात आलीय. (Shiv Sena has once again targeted the BJP government)

काश्मीरमधील टार्गेट किलिंगचा संदर्भ देत संपादकीयात म्हटले आहे की, Artice 370 हटवल्याने काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होईल, असा दावा सरकार करत आहे, पण तसे झालेले नाही. भाजपवर टीका करताना अग्रलेखात म्हटले आहे की, जे हिंदुत्वाबद्दल गळा काढतात ते, गरज पडेल तेव्हा गप्प बसतात. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकच्या मदतीने भाजपने गेल्यावेळी सरकार स्थापन केले होते, पण काश्मीरमधील परिस्थिती पाहून आता लोकांना त्यांच्या वास्तवाची कल्पना आली आहे.

'काश्मिरींना देशद्रोही ठरवू नये'

भाजपला विरोध करणाऱ्या काश्मिरींना देशद्रोही ठरवू नये, असे संपादकीयात टोला मारण्यात आला आहे. 'सामना'ने पाकिस्तानमधील हवाई हल्ल्याबाबत प्रश्न उपस्थित करत त्याबाबत शंका व्यक्त केली होती. अग्रलेखात म्हटले आहे की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची 56 इंच छाती आणि हृदय हिंदूंप्रती दाखवले आहे. 

'सामना'तून शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. 'भारतीय जनता पक्ष हे अजब रसायन आहे. हे लोक राष्ट्रीय किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर गळा काढून बोलत असले, तरी जेव्हा हिंदुत्व खरोखरच अडचणीत येते, तेव्हा तोंडाला कुलुप लावून गप्प बसलेले दिसतात. काश्मीर खोर्‍यातील हिंदू पंडितांच्या हत्या आणि काश्मीर सोडण्याबाबत भाजप आणि त्यांचे दिल्लीचे अधिकारी गप्प बसले आहेत. देशभरातील भाजपवाले मोदी सरकारचा आठवा वाढदिवस साजरा करत आहेत.

आठ वर्षांच्या कालावधीला उत्सवाचे स्वरुप दिले जात असल्याचे अग्रलेखात पुढे म्हटले आहे. मोदी सरकारने अवघ्या आठ वर्षांत देशाचे नंदनवन कसे केले, याचे उदाहरण दिले जात आहे. काश्मीरमधून Artice 370 हटवले, पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक, दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले, असे बोलले जात आहे. पण ही भजन-कीर्तने सुरु असताना, काश्मीर खोर्‍यातील आगीच्या ज्वाला या उत्सवी लोकांना दिसत नाहीत, हे आश्चर्यकारक आहे. 

ज्या सर्जिकल स्ट्राईकचे कौतुक केले जात आहे, त्या सर्जिकल स्ट्राईकचा कॅश करुन मागच्या निवडणुका जिंकल्या, पण आज काश्मीरची स्थिती बिकट झाली असून हिंदूंच्या रक्ताची नदी तेथे वाहत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. काश्मिरी पंडित मारले जात आहेत. हिंदूंनी सामुदायिक पलायन सुरु केले आहे. पंडितांचा एक गट काश्मीरच्या रस्त्यावर उतरुन भाजपला शिव्या देत आहे, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.