युतीच्या जागावाटपाबाबत आजपासून शिवसेना-भाजपचा श्री गणेशा

युती होणार असं आतापर्यंत दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून भाष्य होत आहे.

Updated: Sep 4, 2019, 04:34 PM IST
युतीच्या जागावाटपाबाबत आजपासून शिवसेना-भाजपचा श्री गणेशा title=

मुंबई : शिवसेना आणि भाजपा यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी युतीच्या जागावाटपाबाबत आजपासून चर्चा सुरु होणार आहे. जागावाटपाबाबत दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये ही बैठक होणार आहे. भाजपतर्फे चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आणि शिवसेनेतर्फे सुभाष देसाई आणि इतर नेते चर्चा करणार आहेत. गणेशोत्सवानंतर युतीच्या जागावाटपावर निर्णय घेतला जाणार आहे. त्यानुसार गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीच आता दोन्ही मित्रपक्षांची जागावाटपाची चर्चा होणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत युती होणार का अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. दोन्ही पक्षांचे नेते युतीबाबत सकारात्मक भाष्य करत आहे. युती होणारच असं दोन्ही पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. पण जागावाटप हा युतीतला सर्वात मोठा संघर्ष असणार आहे. 2014 ला विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची 25 वर्षांची युती तुटली होती. त्यानंतर काही काळ विरोधी पक्षात बसलेल्या शिवसेनेनं भाजपशी जुळवून घेण्याचं धोरण स्वीकारलं आणि सत्तेत सहभागी झाले. पण सत्तेत असूनही शिवसेना सतत भाजपवर टीका करत आहे.

उद्धव ठाकरे यांनी तर युतीत 25 वर्ष सडल्याचं विधान करत यापुढे युती नाही अशी गर्जनाच केली होती. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दोघे पुन्हा एकत्र आले. आता विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची चर्चा सुरु होणार आहे. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी भाजप-शिवसेनेत चढाओढ लागली आहे. विधानसभेचं जागावाटप 50-50 टक्के ठरल्याचं या दोन्ही पक्षांचे नेते आतापर्यंत सांगत आले आहेत. मात्र हे पन्नास टक्केचा फॉर्म्युला नक्की कसा असणार आहे. हे अजून समोर आलेलं नाही.

भाजपचे सध्या 122 आमदार तर शिवसेनेचे 63 आमदार आणि मित्रपक्षांच्या 18 जागा याची बेरीज केली तर ती होते 203, एकूण 288 जागांमधून 203 वजा केले तर उरतात 85 जागा. या 85 जागांचे निम्मे केले तर 42.5 म्हणजेच 43 जागा होतात. आता यातील भाजपच्या वाट्याला 122 आणि 43 म्हणजेच 165 आणि शिवसेनेच्या 63 आणि 43 अशा 106  जागा होतात. त्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून येणाऱ्या आमदारांच्या जागावर हे दोन्ही पक्ष आग्रह धरणार, त्यामुळेच सध्याची ही राजकीय स्थिती पाहता युती होण्याबाबत राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त केली जाते आहे. मात्र या दोन्ही पक्षांचे नेते अजूनही युती होणारच असा दावा करत आहेत.

एकीकडे युती होणारच असं भाजप-शिवसेनेचे नेते सांगत असले तरी या दोन्ही पक्षांनी राज्यातील सर्व म्हणजेच 288 जागा लढवण्याची तयारीही ठेवली आहे. म्हणजेच आयत्या वेळी युती तुटली तर अडचण नको यासाठी हे दोन्ही पक्ष तयार आहेत. त्यातच आमचं ठरलंय सांगणारे या पक्षाच्या नेत्यांमध्ये युतीबाबत या दोन्ही पक्षात अद्याप अधिकृत चर्चा झालेली नाही.