मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये पार पडला. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. 'अजित पवारांच्या डोळ्यात अश्रू आले. राजकारणाचा स्तर खालावला आहे, म्हणून मी शेती करणार. मग धरणात पाणी नसेल तर काय करणार?' असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. तसंच शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं तेव्हा अजित पवार काय म्हणाले होते? त्यांच्या कर्मामुळेच अजित पवारांच्या डोळ्यात पाणी आलं. हे मगरीचे अश्रू आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
शरद पवारांच्या ईडी प्रकरणावरूनही उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला. महाराष्ट्रात सुडाचं राजकारण चालणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण हे म्हणतानाच त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेसाठी झालेल्या प्रयत्नावरही भाष्य केलं.
काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आता थकले आहेत. दोन्ही पक्षांचं विलिनीकरण होऊ शकतं, असं वक्तव्य सुशीलकुमार शिंदेंनी केलं होतं. या वक्तव्यावरही उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला. काँग्रेस-राष्ट्रवादी ५०-६० वर्ष खाऊन-खाऊन थकले आहेत. पण जास्त थकू नका, आमच्या विजयाचे पेढे खायला ताजेतवाने राहा, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.