मुंबई : आगामी काळात देशातील सर्व पक्ष संपतील, फक्त भाजप (BJP) हाच एकमेव पक्ष शिल्लक राहील. महाराष्ट्रात शिवसेनेचा (Shivsena) अंत होत असून भाजपचा मुकाबला करण्याची क्षमता कोणत्याही राष्ट्रीय पक्षात नाही, असं विधान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda) यांनी केलं होतं. या विधानावर शिवसेनेने जोरदार टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर निशाणा
जे पी नड्डा यांच्या विधानावर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आतापर्यंत शिवसेना फोडण्याचं अनेक प्रयत्न झाले, पण आता शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पण त्यांना माहित नाही की अशी आव्हानं पायदळी तुडवत त्याच्यावर आम्ही झेंडा रोवला आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राजकारणात हार जीत होत असते, पण संपवण्याची भाषा केली जात नाही, ती आता होतेय, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या याचिकेवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी आपला न्यायदेवतेवर विश्वास असल्याचं म्हटलं आहे.
शिवेसना कोणाची? उद्या कोर्टात सुनावणी
दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे यांची कि एकनाथ शिंदे यांची या प्रकरणावर उद्या सकाळी 10.30 सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल. आज दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवात केला. उद्या पुन्हा युक्तीवाद होईल. त्यानंतर सुप्रीम कोर्ट आपला निर्णय देईल.
आज उद्धव ठाकरे यांच्या गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे गटातील आमदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार, अपात्रतेची कारवाई झाली पाहिजे, यासाठी जोरदार युक्तिवाद केला. तर शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनीदेखील आम्ही अजून पक्ष सोडला नसल्याने पक्षांतर बंदी कायदा आम्हाला लागूच होऊ शकत नाही, असा युक्तिवाद केला.