महाराष्ट्रातील लहान भावाला पंतप्रधान म्हणून साथ देण्याची जबाबदारी मोदींची

नरेंद्र मोदी व उद्धव ठाकरे यांच्यातील नाते भावा-भावाचे

Updated: Nov 29, 2019, 07:41 AM IST
महाराष्ट्रातील लहान भावाला पंतप्रधान म्हणून साथ देण्याची जबाबदारी मोदींची

मुंबई : शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अवघ्या महाराष्ट्राने हा शपथविधी सोहळा याची देहा.. याची डोळा अनुभवला... यानंतर साऱ्यांच्या नजरा होत्या त्या शुक्रवारच्या 'सामना' अग्रलेखाकडे. दिल्ली देशाची राजधानी जरूरू आहे, पण महाराष्ट्रही दिल्लीश्र्वराचा गुलाम नाही हे 'सामना'तून अधोरेखित केलं आहे. 

बघता काय? सामील व्हा! सुराज्याचा उत्सव!! या मथळ्याखाली 'सामना'चा अग्रलेख लिहिण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मराठी जनता दिल्लीशी झुंजली. संघर्ष केला. संघर्ष आणि लढे आमच्या पाचवीलाच पुजले आहेत. 'सामना'तून महाराष्ट्राचा बाणा आणि सरकारचा कणा ताठ राहील याची खात्री बाळगायला हरकत नाही. 

पाच वर्षांत पाच लाख कोटींचे कर्ज राज्यावर लादले व फडणवीस सरकार गेले. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांनी जे संकल्प योजले आहेत त्यावर वेगाने पण सावधपणे पावले टाकावी लागतील. तसेच पंतप्रधान मोदींनी नव्या सरकारला व मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने गतिमान विकास घडवावा, असे आमच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले. 

सामनामधून केंद्राला खडे बोल लगावले आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दुःखाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी केंद्रालाच सहकार्याचा हात पुढे करावा लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप-शिवसेनेचे बिनसले आहे. पण नरेंद्र मोदी व उद्धव ठाकरे यांच्यातील नाते भावा-भावाचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लहान भावाला पंतप्रधान म्हणून साथ देण्याची जबाबदारी मोदींची आहे. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे असतात. एका पक्षाचे नसतात हे सूत्र ठेवले तर जे आपल्या विचारांचे नाहीत त्यांच्या सरकारविषयी मनात राग-लोभ का ठेवायचा? 

हे राज्य जनतेचे आहे व ते 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्माण झाले आहे. देशाचे अर्थकारण मुंबईवर चालले आहे. देशाला सर्वाधिक रोजगार मुंबईसारखी शहरे देत आहेत.