शेतकरी आंदोलनाचा चीन-पाकिस्तानशी संबंध जोडणाऱ्या दानवेंना संजय राऊत यांचा खोचक टोला

 रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसंदर्भात (Farmers Protest) केलेल्या वक्तव्यावर शिवसेना (Shiv Sena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.  

Updated: Dec 10, 2020, 11:24 AM IST
शेतकरी आंदोलनाचा चीन-पाकिस्तानशी संबंध जोडणाऱ्या दानवेंना संजय राऊत यांचा खोचक टोला title=

मुंबई : भाजप (BJP) नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसंदर्भात (Farmers Protest) केलेल्या वक्तव्यावर शिवसेना (Shiv Sena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, पुरावे द्या. दानवे यांच्या म्हणण्यानुसार जर हे खरं असेल तर केंद्र सरकारने चीन आणि पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करावा. रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा केला आहे. हे शेतकऱ्यांचे आंदोलन नाही, असेही दानवे जालना येथील जाहीर कार्यक्रमात म्हणाले होते. त्यांच्या वक्तव्याचा राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. 

शेतकरी आंदोलनात चीन, पाकिस्तानचा हात

 केंद्र सरकारने रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य गांभीर्यानं घ्यावे. 'सरकारने चीन, पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करावा, कारण जर केंद्राचा एखादा मंत्री अशी माहिती देत असेल तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानावर लगेच सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे. जर आपल्या देशात बाहेरची शक्ती, हात अस्थिरता, अशांतता निर्माण करत असतील तर राष्ट्रभक्त असल्याच्या नात्याने शिवसेना हे वक्तव्य फार गांभीर्याने घेत आहे. संरक्षणमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि लगेच चीन-पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. शेतकरी आंदोलनाचा चीन, पाकिस्तानशी संबंध जोडणाऱ्या रावसाहेब दानवे यांना संजय राऊत यांनी असा खोचक टोला लगावला आहे.

जालना । आंदोलन बाहेरच्या देशाचे षडयंत्र

दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) नसून या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे वादग्रस्त विधान भाजपचे नेते (BJP) आणि केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केले होते. हे आंदोलन बाहेरच्या देशाचे षडयंत्र असून आपल्या देशातील लोकांनी याचा विचार केला पाहिजे, असेही दानवे म्हणाले. आंदोलन करणारे लोक हे सुटाबुटातील लोक आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे कोणाच्या भूल थापांना बळी पडू नका, असे आवाहन देखील दानवे यांनी केले आहे.