नवी मुंबईत महाआघाडी विरुद्ध गणेश नाईक अशीच लढत होण्याची शक्यता

नवी मुंबई महापालिकेत महाआघाडी विरुद्ध भाजप अशीच लढत होणार?

Updated: Dec 8, 2019, 09:45 PM IST
नवी मुंबईत महाआघाडी विरुद्ध गणेश नाईक अशीच लढत होण्याची शक्यता

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक ही महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यावर लढवली जाणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. याबाबत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची बैठक झाली आहे. या बैठकीत प्रभाग रचना रद्द करावी अशी मागणी बहुतांश स्थानिक नेत्यांनी केली आहे. याबाबत पक्ष श्रेष्ठी निर्णय घेणार असल्याचही शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

नवी मुंबईत गणेश नाईक यांचं वर्चस्व आहे. आधी राष्ट्रवादीत असलेले गणेश नाईक आता भाजपमध्ये आल्याने महाआघाडी विरुद्ध गणेश नाईक अशीच लढत होऊ शकते. गणेश नाईक यांच्यासह अनेक राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपमध्ये आले. पण आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आल्यामुळे राज्यातील राजकारणाची गणितं बदलली आहेत.

दुसरीकडे शरद पवार यांनी नवी मुंबई महापालिका जिंकण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. काहीही करुन नवी मुंबई महापालिकेत सत्ता मिळवायची असा त्यांचा चंग आहे. नवी मुंबईतील माथाडी कामगारामध्ये प्रसिद्ध असलेले शशिकांत शिंदे हे शरद पवार यांचे जवळचे मानले जातात. त्यामुळे नवी मुंबईची जबाबदारी शरद पवार हे त्यांना देऊ शकतात. तर जितेंद्र आव्हाड हे देखील त्यांच्यासोबत राहतील.

गणेश नाईकांकडून महापालिका हिसकावून घेण्यासाठी शरद पवार येथे महाआघाडीसोबत लढतील अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कामाला ही लागली आहे. महापालिकेत गणेश नाईकांचा पराभव म्हणजे त्यांचं वजन नवी मुंबईत कमी होईल.