पंकजा मुंडे काय करणार? संजय राऊतांचं सूचक वक्तव्य

फडणवीस आणि भाजप हे राज्याचे गुन्हेगार असल्याचं म्हणत...

Updated: Dec 2, 2019, 03:50 PM IST
पंकजा मुंडे काय करणार? संजय राऊतांचं सूचक वक्तव्य
संग्रहित छायाचित्र

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपच्या भूमिकांवर शाब्दिक वार केले आहेत. सोमवारी पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी बऱ्याच राजकीय घडमोडींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गुन्हेगार असल्याचंही म्हटलं. 

देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा ते फक्त ८० तासांसाठी राज्याच्या मुख्यमंत्री पदावर होते. यादरम्यान त्यांनी केंद्राकडून आलेला ४० हजार कोटी रुपयांचा निधी केंद्रालात परत दिल्याचा गौप्सस्फोट भाजप नेता अनंत हेगडे यांनी केला. यावरच प्रतिक्रिया देत असं झालं असल्याच फडणवीस आणि भाजप हे राज्याचे गुन्हेगार असल्याचं म्हणत त्यांच्यावर तोफ डागली. 

राऊतांनी माध्यमांशी संवाद साधतेवेळी पंकजा मुंडे यांच्याही पुढील वाटचालीविषयी सूचक वक्तव्य केलं. काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांनी एक ट्विट करत त्यांच्या राजकीय भूमिकेविषयीची एक लक्षवेधी पोस्ट केली होती. ज्यानंतर आता त्यांनी ट्विटर अकाऊंटवर देण्यात आलेल्या माहितीतूनही त्यांनी भाजपचा उल्लेख काढला आहे. त्यामुळे आता भाजपवर असणारी त्यांची नाराजीच त्यांच्या या कृत्यांतून स्पष्ट होत आहे. याचविषयी विचारलं असता राऊत यांनीही १२ डिसेंबरलाच पंकजा मुंडे यांच्याविषयी कळेल असं वक्तव्य केलं. 

सध्याच्या घडीला सत्तासंघर्षांमध्ये काही नेतेमंडळी आपल्या पक्षांतून काढता पाय घेण्याच्या तयारीत असल्याचं चित्र दिसत आहे. याच धर्तीवर राऊतांचं वक्तव्यही विचार करण्यास भाग पाडत आहे. अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं म्हणत राऊत यांनी राजकीय मुद्द्यावरील उत्सुकता आणखी वाढवली आहे. 

दरम्यान, राऊत यांनी बजाज उद्योग समुहाच्या राहुल बजाज यांच्या एका वक्तव्याविषयीसुद्धा मतप्रदर्शन केलं. भाजप सरकारविषयी थेट शब्दांत नाराजीचा सूर आळवणाऱ्या बजाज यांच्याविषयी सांगताना सध्याच्या घडीला ते या देशातील उद्योजकांचा आवाज झाले आहेत असं म्हणत संजय राऊत यांनी बजाज कुटुंबातचं देशातील स्वातंत्र्यातील योगदान अधोरेखित केलं.