मुंबई : निवडणूक निकालानंतर आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेनेचा सूर आता नरमला आहे. शिवसेना आणि भाजप एकत्र येण्यातच दोघांचं हित आहे, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. 'जर ठरल्याप्रमाणे सगळं सुरळीत घडलं, तर राज्याचं सरकार ५ वर्ष स्थिर असेल. मुख्यमंत्र्यांना काम करण्याची संधी, स्वातंत्र्य आणि मुभा मिळाली पाहिजे. महायुतीचं सरकार यावं ही आमचीही इच्छा आहे. फक्त गोष्टी ठरल्याप्रमाणे व्हायला पाहिजेत,' असं संजय राऊत म्हणाले.
'बहुमतासाठी १४५ हा आकडा आहे. ज्यांच्याकडे बहुमत असेल, त्यांचा मुख्यमंत्री होईल. प्रसारमाध्यमांनी कोणत्याही पुड्या सोडू नयेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो आदेश देतील, त्याप्रमाणे निर्णय होईल,' अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. या निवडीनंतर राज्यात महायुतीचं सरकार येईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या या भूमिकेचंही संजय राऊत यांनी स्वागत केलं. सोबत राहण्यात दोन्ही पक्षांचं आणि महाराष्ट्राचं हित आहे, असं राऊत म्हणाले.
गुरुवारी शिवसेनेच्या विधीमंडळ पक्षनेतेपदाची निवड होणार आहे. शिवसेना आमदारांची बैठक झाल्यानंतर उद्धव ठाकरे या नावाची घोषणा करणार आहे. गटनेतेपदी आदित्य ठाकरे यांचं नाव येतं का एकनाथ शिंदे यांचं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.