संजय राऊतांचा शायराना अंदाज; 'अभी तो पूरा आसमान बाकी है...'

महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाच्या दिवसाचे साक्षीदार होत असणाऱ्या 

Updated: Nov 27, 2019, 08:18 AM IST
संजय राऊतांचा शायराना अंदाज; 'अभी तो पूरा आसमान बाकी है...'

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाच्या दिवसाचे साक्षीदार होत असणाऱ्या सर्वसामान्यांचं लक्ष पुन्हा एकदा शिवसेनेच्या संजय राऊत यांनी वेधलं आहे. साधारण एका महिन्याहून अधिक काळ सातत्याने पत्रकार परिषदा घेत, माध्यमांशी संवाद साधत ठाकरी शैलीमध्ये त्यांनी विरोधकांवर तोफ डागली. याच संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदावर निवड केल्यानंतर शपथविधी सोहळ्याच्या दिवशी एक लक्षवेधी ट्विट केलं आहे. 

'अभी तो इस बाज की असली उड़ान बाकी है
अभी तो इस परिंदे का इम्तिहान बाकी है 
अभी अभी मैंने लांघा है समुंदरों को
अभी तो पूरा आसमान बाकी है', या ओळींच्या माध्यमातून राऊत यांचा शायराना अंदाज पुन्हा पाहायला मिळाला. 

'अभी तो पूरा आसमान बाकी है', असं म्हणणाऱ्या संजय राऊत यांनी एका अर्थी महाराष्ट्रविकासआघाडीच्या आगामी कारकिर्दीविषयीच्या आशाच व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा लागून राहिलेल्या या सरकारकडून येत्या काळात कोणती धोरणं राबवण्यात येणार आणि ही आघाडी राज्याला कोणत्या प्रगतीपथावर नेणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल. 

दरम्यान, शिवसेनेचाच मुख्यमंत्री येणार असं मोठ्या आत्मविश्वासाने सांगत, आपल्या भूमिकेवर ठाम असणाऱ्या राऊत यांचंही या सत्तास्थापनेत उल्लेखनीय योगदान राहिल्याचं म्हणत राऊतांनाही याचं श्रेय जात असल्याचं मत अनेकांनी मांडलं आहे.