मुंबई : मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातमध्ये हलविण्यात येत असून याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार हेच नेते जबाबदार असल्याची टीका उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. मागील पाच वर्षे सत्तेत असताना फडणवीस व मुनगंटीवार मूग गिळून का गप्प होते, यांनी याबाबत केंद्र सरकारला एकही पत्र का पाठविले नाही, असा सवाल सुभाष देसाई यांनी उपस्थित केला आहे.
सुभाष देसाई म्हणाले की, मुंबईतील बांद्रा कुर्ला संकुल परिसरात आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र व्हावे, यासाठी मी अनेकदा प्रयत्न केले. वित्तीय सचिव, नगरविका सचिव तसेच उद्योग सचिवांच्या बैठक घेतल्या. याशिवाय मंत्रिमंडळ बैठकीत दोनवेळा हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याकडे दुर्लक्ष केले. केंद्रातील भाजप नेते डोळे वटारतील म्हणून हे नेते मूग गिळून गप्प होते.
वित्तीय केंद्रासाठी एमएमआरडीने सेझ प्रस्तावित केला होता. त्याला मी दोन वेळा मुदतवाढ देखील दिली होती. परंतु दिल्लीश्वरांची नाराजी नको म्हणून नेत्यांनी या केंद्राकडे दुर्लक्ष केले. अद्याप देखील हे दोन्ही नेते या मुद्यावर बोलत नाहीत. यावरून त्यांचा दुटप्पीपणा दिसून येत आहे, असे देसाई म्हणाले.
बुलेट ट्रेनच्या मुख्यालयासाठी बीकेसीमध्ये जागा देऊ नये, इतर ठिकाणी जागा देण्याबाबत मी आग्रह धरला होता. परंतु भाजप नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असेही देसाई यांनी सांगितले.
मुंबईचे वित्तीय केंद्र गांधीनगर येथे हलवून महाराष्ट्रावर अन्याय केला. मात्र, फडणवीस व मुनगुंटीवार यांनी याचा साधा निषेध केलेला नाही. असे असले तरी अद्याप आम्ही प्रयत्न सोडले नाहीत. केंद्र सरकारने आपल्या निर्णयाचा पुनःविचार करावा, मुंबईतच व्यापारी केंद्र झाले पाहीजे, हा आमचा आग्रह कायम राहील, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.