मुंबई महापालिका निवडणुकीत रंगणार शिवसेना विरुद्ध भाजप सामना

मुंबई महापालिकेसाठी आतापासूनच तयारी... 

Updated: Dec 8, 2019, 09:58 PM IST
मुंबई महापालिका निवडणुकीत रंगणार शिवसेना विरुद्ध भाजप सामना title=

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना आणि भाजपचं पार बिनसलं आहे. या बिनसण्याचे परिणाम आता मुंबई महापालिकेत दिसणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीला अजून अडीच वर्षं आहेत. पण भाजप कामाला लागली आहे. भाजप संघटनेच्या बैठकीत त्याची रणनीती ठरली आहे.

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळूनही सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपने आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. 

भाजपच्या 227 वॉर्डनिहाय बैठका सुरू झाल्या आहेत. सध्या मुंबई महापालिकेत पहारेकऱ्यांच्या भूमिकेत असलेली भाजप आता थेट विरोधकांच्या भूमिकेत जाणार आहे. महापालिका कारभारावरून शिवसेनेला घेरण्यासाठी भाजप आक्रमक होणार आहे. मुंबईत संघटनात्मक ताकद वाढवण्यावर भर दिला जातो आहे. भाजप नेत्यांनी महापालिका निवडणुकीत भाजपच्या विजयाचा दावाही केला आहे.

गेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला शिवसेनेपेक्षा पाचच जागा कमी असतानाही भाजप सत्तास्थापनेच्या शर्यतीत उतरली नव्हती. आता मात्र सगळीच समीकरणं बदलली आहेत. त्यामुळे महापालिकेसाठीचा सामना जोरदार रंगणार आहे.

मुंबई महापालिका ही शिवसेनेसाठी अस्तित्वाची असते. त्यामुळे आता थेट शिवसेनेचा गड मिळवण्यासाठी भाजपने सुरुवात केली आहे. याआधीच्या निवडणुकीत भाजपला ही चांगलं यश मिळालं होतं. भाजपने शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला होता.

सध्याचं पक्षीय बलाबल

शिवसेना ९४

भाजप ८२

काँग्रेस २९

राष्ट्रवादी ८

समाजवादी पक्ष ६

मनसे १