शिवसेना राज्यपालांना देणार पाठिंबा असलेल्या आमदारांची यादी

सत्तास्थापनेसाठी शिवसेनेची तयारी.

Updated: Nov 11, 2019, 08:17 AM IST
शिवसेना राज्यपालांना देणार पाठिंबा असलेल्या आमदारांची यादी title=

मुंबई : शिवसेनेला पाठिंबा असलेल्या आमदारांची यादी बनवण्यासाठी शिवसेनेने तयारी केली आहे. यासाठी शिवसेना आमदारांच्या सह्या घेण्यास सुरूवात झाली आहे. ही यादी राज्यपालांना दिली जाणार आहे. हॉटेल द रिट्रिट इथं वास्तव्यास असलेल्या आमदारांच्या सह्या घेण्यास रात्रीपासून सुरूवात झाली आहे. राज्यपालांनी सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिल्यानंतर आज राज्यपालांना भेटून ही यादी दिली जाणार आहे. शिवसेनेच्या ५६ आमदारांसह ८ अपक्ष आमदारही शिवसेनेच्या यादीत असणार आहेत. ज्या याआधीच शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.

सत्ता स्थापनेच्यादृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. भाजपनं सत्ता स्थापनेच्या निमंत्रणास नकार दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेकडे सत्ता स्थापनेची विचारणा केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. शिवसेना भाजप युतीचा काडीमोडी होण्याची चिन्ह आहेत. शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे शिवसेना भाजपाप्रणित एनडीएतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. अरविंद सावंत यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. तर आधी एनडीएतून बाहेर पडावं, भाजपशी नातं तोडावं मग शिवसेनेच्या प्रस्तावावर चर्चा विचार करु अशी भूमिका राष्ट्रवादीनं घेतली आहे. या साऱ्या प्रकरणात काँग्रेसची भूमिकाही महत्त्वाची आहे. काँग्रेसचे आमदार जयपूरमध्ये असून ते हायकमांडच्या आदेशांची वाट पाहत आहेत.