अंमली पदार्थांची तस्करी यूट्यूबच्या माध्यमातून?

 हाय प्रोफाइल अंमली पदार्थ तस्कराला अमली पदार्थ विरोधी शाखेने अटक केल्यानंतर अंमली पदार्थांची तस्करी युट्युबच्या माध्यमातून केली जात होती याचा खुलासा झाला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 15, 2017, 03:02 PM IST
अंमली पदार्थांची तस्करी यूट्यूबच्या माध्यमातून? title=

अजित मांढरे, झी मीडीया, मुंबई : हाय प्रोफाइल अंमली पदार्थ तस्कराला अमली पदार्थ विरोधी शाखेने अटक केल्यानंतर, अंमली पदार्थांची तस्करी युट्युबच्या माध्यमातून केली जात होती याचा खुलासा झाला आहे.

बकुल चंदेरीया-हायप्रोफाईल अंमली पदार्थ तस्कर

बकुल चंदेरीया असं या हायप्रोफाईल अंमली पदार्थ तस्कराचे नाव असून, त्याची युट्युबवरील अंमली पदार्थ तस्करीची युक्ती पाहून मुंबई पोलीस ही चक्रावलेत.

काही नेते, अभिनेते, बड्या अधिकाऱ्यांची मूलं

या बकूलचे बॉलिवूड कनेक्शन समोर आल्यानंतर आता राजकीय नेते, उद्योगपती आणि बड्या अधिकाऱ्यांच्या मुलांना देखील हा बकूल अंमली पदार्थ पुरवायचा असा संशय अंमली पदार्थ विरोधी पथकाला आहे.

शब्दांचा किंवा चित्रांचा वापर करुन रेव्ह पार्टीचे निमंत्रण

अंमली पदार्थाच्या रेव्हपार्टी करता सोशल मिडीयावरुन सांकेतिक शब्दांचा किंवा चित्रांचा वापर करुन रेव्ह पार्टीचे निमंत्रण दिल्याचे तुम्ही ऐकले असेल पण सांकेतिक शब्दांचा आणि चित्रांचा वापर करुन अंमली पदार्थ सोशल मिडायावर विकले जातात यावर तुमचा विश्वास बसणार नाही.

चित्र पाहून अंमली पदार्थांची नावं

लॉर्ड शिवा, लॉर्ड बुद्धा आणि दलाई लामा ही नावं ऐकून किंवा यांचे चित्र पाहून ही अंमली पदार्थांची नावं असतील याचा तुम्ही विचार देखील कधी केला नसणार.

ट्रान्स म्युजिकचे व्हिडिओ सर्च रिझल्ट

जे ड्रग्स पाहिजे असेल त्याचा सांकेतिक शब्द वापरुन युट्यूबवर सर्च केल्यास ते ते सांकेतिक शब्द हॅश टॅग म्हणुन वापरलेले ट्रान्स म्युजिकचे व्हिडिओ सर्च रिझल्ट म्हणुन येतात तेथे कमेंटमध्ये चॅट करुन अंमली पदार्थ विकले जातात. 

हायप्रोफाईल अंमली पदार्थ तस्कराकडून माहिती उघड

ही माहिती मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केलेल्या बकुल चंदेरीया नावाच्या एका हायप्रोफाईल अंमली पदार्थ तस्कराकडून समोर आली आहे. 

तस्कर म्हणुन हा बकुल चंदेरीया कुप्रसिद्ध

बकुल चंदेरीया ... बस नाम ही काफी है ... अंमली पदार्थ तस्करी दुनियेत या बकुलचे बस नावच काफी आहे ... कारण अंमली पदार्थ तस्करी दुनियेत चालाख आणि हायप्रोफाईल अंमली पदार्थ तस्कर म्हणुन हा बकुल चंदेरीया कुप्रसिद्ध आहे.

नामी शक्कल काढून अंमली पदार्थांची तस्करी

बॉलिवूड सेलिब्रिटी, राजकीय नेते, अधिकारी आणि उद्योगपती यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याने, बकुलची हायप्रोफाईल तस्कर म्हणुन ओळख आहे. तर, पोलिसांना गुंगारा देण्यासाठी नामी शक्कल काढून अंमली पदार्थांची तस्करी करतो, म्हणून चालाख तस्कर ही दुसरी ओळख.

बकुलला अनेकदा अटकही झाली आहे, पण

बकुलला अनेकदा अटकही झाली आहे, पण तो त्याचे हायप्रोफाईल वजन वापरुन बाहेर यायचा. यंदा मात्र बिहारचे सिंघम उपाधी असलेल्या आयपीएस शिवदीप लांडे यांच्या तावडीत हा सापडलाय. 

अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून बेड्या

याआधी जुहू येथील ओखवूड ड्रग्स पार्टी प्रकरणी देखील पोलिसांनी बकुल चंदेरीयाला अटक केली होती. गेल्या महिन्याभरापासुन अंमली पदार्थ विरोधी पथक बकुलच्या मागावर होते. अखेर बकूलला अंमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.