मराठी अभिनेत्याच्या बायकोकडून ज्येष्ठ नागरिकाला लाखोंचा गंडा

मदतनीस असल्याचे सांगत 72 वर्षीय व्यक्तीची जवळपास पावणे चार लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

Updated: Dec 2, 2021, 08:01 PM IST
मराठी अभिनेत्याच्या बायकोकडून ज्येष्ठ नागरिकाला लाखोंचा गंडा

ठाणे : ठाणे परिसरातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका मराठी अभिनेत्याच्या बायकोनं एका वयस्कर माणसाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. ही बाब जेव्हा त्या व्यक्तीच्या आणि बँकेच्या लक्षात अली तेव्हा त्या महिलेविरुद्ध पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली. ज्यानंतर ठाणे पोलिसांनी या महिले विरोधात गुन्हा दाखलं केला आहे. या महिलेनं स्वत:ला एका राष्ट्रीय बँकेत मदतनीस असल्याचे सांगत 72 वर्षीय व्यक्तीची जवळपास पावणे चार लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही 72 वर्षीय व्यक्ती निवृत्त प्रध्यापक आहेत. तसेच ते ठाण्यातील आनंद नगर येथील रहिवासी आहेत. कासारवडवली परिसरातील एका राष्ट्रीय बँकेच्या शाखेत त्यांचे खाते आहे. या बँकेत त्यांची दोन खाती आहेत. ज्यापैकी एकामध्ये त्यांची पेन्शन जमा होते.

12 नोव्हेंबर रोजी ही व्यक्ती बँकेत व्यवहार करण्यासाठी बँकेत गेली होती. त्यावेळी मदत करण्याच्या उद्देशाने ही आरोपी महिला त्यांच्याकडे गेली. आपण बँकेत ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी आहोत, असे तिने त्यांना सांगिकले. त्यानंतर तिने त्यांच्याकडे चेक बुक आणि पासबुकची मागणी केली.

या व्यक्तीने जेव्हा या महिलेला ते सगळं दिले तेव्हा तिने ते दोन्हीही भरून देतो, असे सांगितले. त्यावेळी ज्येष्ठ नागरिकाने तिला आपल्याकडील दोन चेक त्या महिलेला दिले. त्यातील एक चेक हा पाच लाख रुपयांचा होता, तर दोन चेक दोन लाख रुपयांचे होते.

15 नोव्हेंबर रोजी आरोपी महिला आणि ज्येष्ठ नागरिक बँकेत पुन्हा एकदा भेटले. ते बँकेत मुदत ठेवीच्या कामासाठी गेले होते. त्यावेळेस देखील ही महिला त्यांच्या जवळ गेली आणि त्यांच्याकडून काही कागदपत्रे मागीतली आणि एफडी करुन देते असे त्यांना सांगितले.

त्यानंतर ही आरोपी महिला 24 तारखेला या ज्येष्ठ व्यक्तीच्या घरी गेली आणि काही कारण सांगून त्यांच्याकडून चेकवरती सही घेतली आणि तेथून निघून गेली.

परंतु या आजोबांचं नशीब चांगलं होतं, ज्यामुळे त्यांचे डोळे उघडले आणि या महिलेचे पितळ उघडे पडले.

बँकेच्या व्यवस्थापनाकडून या आजोबांना फोन आला आणि त्यांना सांगितले की, तुमच्याकडून दोन चेक मिळालेले आहेत. त्यातील एका चेकवर तुमचे नाव आहे, तर दुसऱ्या चेकवरती या महिलेचे नाव आहे, तर तुम्हाला ही रक्क्म त्यांना हस्तांतरीत करायची आहे का? तेव्हा या व्यक्तीने व्यवस्थापकाला नाही म्हणून सांगितले आणि थेट बँक गाठली.

बँकेत पोहोचल्यावरती या व्यक्तीने आरोपी महिलेला जाब विचारला आणि माझ्या खात्यातून तुमच्या बँक खात्यात पैसे का वळवत आहेत असा प्रश्न उपस्थीत केला. परंतु तुमचा काही तरी गैरसमज होत आहे असे, त्या महिलेनं उत्तर दिलं. त्यानंतर या व्यक्तीने बँकेच्या शाखेत धाव घेतली. त्यावेळी त्यांच्या खात्यातून जवळपास पावणेचार लाख रुपये वळते झाल्याचे निदर्शनास आले. 
महिला तिथे असतानाच, या व्यक्तीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या महिलेला अटक केली.