ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या सोनेरी कारकीर्दीचा गौरव, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान

गेली आठ दशकं आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अनेक दिग्गज उपस्थित होते.

Updated: Mar 24, 2023, 10:37 PM IST
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या सोनेरी कारकीर्दीचा गौरव, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान title=

Maharashtra Bhushan Award : आपल्या सुमधुर आवाजाने गेली आठ दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या पद्मविभूषण आशा भोसले (Asha Bhosle) यांना आज भव्यदिव्य सोहळ्यात राज्याचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते आशाताईंना हा पुसस्कार प्रदान देण्यात आला. शाल, मानचिन्ह आणि 25 लाख रुपयांचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवर, मुंबई जिल्हयाचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यावेळी उपस्थित होते. 

निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीला सर्वोच्च अश्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात येतं. सन 2021 या वर्षीचा पुरस्कार गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला. मुंबईत पार पडलेल्या भव्य सोहळ्यात हा पुरस्कार आशाताईंना प्रदान करण्यात आला. 

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या आवाजाने विविध छटांची हजारो गाणी अजरामर करणाऱ्या आशाताई यांचा 1933 साली जन्म झाला. आशाताईंना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. 1943 साली त्यांनी आपल्या कारकिर्दिला सुरुवात केली आणि 1948 साली त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत गाण्याची संधी मिळाली. त्यानंतर पुढची सात दशकं आशाताईने आपल्या सुमधुर आवाजाने लाखो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 

तब्बल हजाराहून अधिक चित्रपटांमध्ये आशाताईंनी प्ले-बॅक सिंगर म्हमून गाणी गायली आहेत. बॉलिवूडमध्ये मेलडी क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशाताईंनी आतापर्यंत 11 हजार पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. विशेष म्हणजे आशाताईंनी हिंदी-मराठीबरोबरच 20 हून अधिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. यात बंगाली, तेलगू, तामिळ, इंग्रजी अशा भाषांचा समावेश आहे. त्यांच्या याच कामगिरीची दखल गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेही घेतली. 2011 मध्ये आशाताईंचं नाव गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं. आशाताईंना आतापर्यंत तब्बल 18 वेळा फिल्मफेअरसाठी नामांकन मिळालं होतं.