Mumbai Sion Dharavi Bridge News: सायन रोड ओव्हर ब्रीज (ROB) 8 फेब्रुवारीच्या रात्रीपासून नागरिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. हा पुल बंद करण्यात यावा, असे आदेश या पूर्वीच निघाले होते. मात्र, स्थानिक लोकांचा विरोध आणि नेत्याच्या दबावामुळं हा पुल सुरु ठेवण्यात आला होता. हा पुल बंद झाल्यानंतर सायनमधील काही शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्रास वाढणार आहे. मात्र, आता 28 फेब्रुवारीपासून पुल बंद करण्याचे आदेश देण्यात आले. पुल बंद होत असल्याने बेस्टनेदेखील पर्यायी मार्गांचा रीप्लान केला आहे. सायन ROB पुलाचे काम येत्या 2 वर्षात पूर्ण होणार आहे. लवकरच मध्य रेल्वे हा पुल तोडण्याचे काम हाती घेणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वे येत्या काळात मेगाब्लॉक घेऊ शकते.
गोखल रोडच्या अपघातानंतर मुंबई महानगरपालिका आणि आयआयटी बॉम्बेकडून मुंबईतील ब्रिटीशकालीन पुलाचे ऑडिट करण्यात आले. धोकादायक पुलांबरोबरच ब्रिटिशकालीन पुल पुन्हा बांधण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. मध्य रेल्वेलाही कुर्ला ते परळपर्यंत पाचवी-सहावी मार्गिका बांधायची असून, त्यात या पुलामुळे अडथळे निर्माण होत आहेत. अशा स्थितीत हा पूल पाडून पुनर्बांधणी केल्यानंतर सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील.
सध्या सायनचा पुल 4 पदरी असून तो 6 पदरी बांधण्यात येणार आहे. सध्या हा पूल दोन स्पॅनचा असून त्यातील एक भाग १५ मीटर रुंद आणि दुसरा भाग १७ मीटर रुंद आहे. मात्र, नवीन बांधण्यात आलेला पुलावर एकच स्पॅन असून तो 51 मीटर रुंद करण्यात येणार आहे. पुलाची रुंदी वाढवल्यानंतर सध्याच्या ट्रॅकच्या पश्चिमी भागात दोन अधिक ट्रॅक वाढवता येणार आहे. त्यामुळं कुर्ला ते परेलपर्यंत पाचव्या व सहाव्या मार्गिकेसाठी फायद्याचे ठरेल.
सायनमधील रेल्वे रूळ आजूबाजूच्या भागापेक्षा खोलगट आहे. बशीसारखा आकार असल्याने मुसळधार पाऊस पडल्यानंतर परिसरात पावसाचे पाणी रेल्वे रूळांवर साचते. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी रेल्वेने अनेक पावले उचलली आहेत. ट्रॅकची उंची वाढवणे हे त्यापैकीच एक काम आहे. परंतु, सध्याच्या आरओबीची उंची केवळ 5.1 मीटर असल्याने ट्रॅकची उंची वाढवणे आता शक्य नाहीये. नवीन पुल 5.4 मीटर उंच असेल. अतिरिक्त उंचीमुळं ट्रॅक वाढवणे शक्य होणार आहे.