Uddhav Thackeray Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 चे बिगुल अखेर वाजलं आहे. संपूर्ण देशभरात 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात 5 टप्प्यात लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 19 एप्रिलपासून 1 जून अशा सात टप्प्यात मतदान पार पडणार असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे पर्यंत पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. तर संपूर्ण लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. "येत्या २० मे रोजी मुंबईत लोकसभेसाठी मतदान आहे. त्यावेळी भाजपचे बारा वाजवायला तयार रहा", असे जाहीर आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. ते डोंगरीत बोलत होते.
"गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेनेच्या विविध शाखांना भेट देत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील डोंगरी या विभागात असलेल्या शिवसेना शाखेला भेट दिली. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. छापे टाकायचे आणि काटे काढायचे, असं मोदी सरकारचं धोरण सुरू आहे. इलेक्टोरल बॉण्डस, जाहिराती, कॉन्ट्रॅक्टर ह्या सगळ्यांकडून सरकार पैसे उकळतंय. म्हणजे जाऊ तिथे खाऊ अशी ह्यांची वृत्ती आहे. 31 मार्चपर्यंत भाजपने आधीच 85 कोटी जाहिरातीसाठी देऊन टाकले आहेत", असे उद्धव ठाकरे म्हणाले.
"आमच्या लहानपणी वाफेवरती चालणार इंजिन होतं, भाजप आणि मिंध्यांचं थापेवरती चालणारं इंजिन आहे. मी मुख्यमंत्री असताना, महाराष्ट्राविरुद्ध बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती. महाराष्ट्राने नेहमी आमच्यासमोर झुकावं, असंच मोदी-शहांना वाटतं! उद्याच्या निवडणुकीनंतर आपल्या देशभक्तीचं पीक ह्या गद्दारांना दिसलं पाहिजे. मोदी आणि शहांनी गेल्या १० वर्षात काही कामं केली नाहीत, पण दुसऱ्याच्या कर्तृत्वावर आपला शिक्का मारला", असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटले.
"आणीबाणीच्या काळात शिवसेनाप्रमुख इकडे आले होते. आता आणीबाणी येऊ नये म्हणून निवडणूक आहे. या जागी शिवसेनाप्रमुखांची सभा झाली होती. मी शिवसेनाप्रमुखांना सोडलेले नाही त्यांचे विचार सोडले नाही. शिवसेनेच्या विचारांच्या पिढ्या तयार होत आहेत. मुंबईत २० मे ला मतदान आहे गाफील राहू नका. मुंबईकर गावी जातो कोकणात जातो, पण २० तारखेला तुम्ही यांचे १२ वाजवण्यासाठी मुंबईत पाहिजे. मुंबईकरांना सुट्टीवर नंतर जाता येईल पण यांना तुम्हाला सुट्टीवर पाठवावा लागेल", असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
"पंतप्रधान आणि अमित शहा यांनी दहा वर्ष काय केले याचा अहवाल प्रकाशित करा. किती पक्ष फोडले किती कंपन्या पळवल्या असाच अहवाल असेल. दुसऱ्याच्या कर्तृत्वावर शिक्का मारणारी हे लोक आहेत. त्यांच्या विभागातले उद्योग गुजरातला गेले. गुजरातला त्याच्या हक्काचा मिळाल पाहिजे पण मात्र महाराष्ट्र लुटू नका", असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.
"निवडणुकीच्या कामाला आरोग्य सेवेचे कर्मचारी नेमतात. धाडी टाकणे चौकशी करणे बदनाम करणे असे सत्र सुरु आहे. सरकारी यंत्रणेचा वापर करून खंडण्या वसूल करणे सुरू आहे. आचारसंहिता लागली असेल तर सरकारी जाहिराती बंद झाल्या पाहिजे. त्यावर यांचे फोटो आहेत. जनतेच्या पैशावर हे सगळं सुरू आहे. जाहिरात एजन्सी कडून हे सगळे लोक कमिशन खातात. देशातली हुकूमशाही गाढायची आहे आणि अरविंद सावंत यांना हक्काचा खासदार म्हणून निवडून द्यायचे आहे", असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटले.