दक्षिण मुंबईत निवडणुकीचं वारं फिरणार? अरविंद सावंतांसमोर यामिनी जाधव यांचं कडवं आव्हान

कुलाबा येथील प्रचार फेरी काढत यामिनी जाधव यांनी मतदारांशी संवाद साधला. त्यांच्या प्रचारफेरीला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा मिळाल्याचं पहायला मिळतंय.

Updated: May 17, 2024, 12:34 AM IST
दक्षिण मुंबईत निवडणुकीचं वारं फिरणार? अरविंद सावंतांसमोर यामिनी जाधव यांचं कडवं आव्हान title=

मुंबईतील हायव्होल्टेज मतदारसंघापैकी एक असलेल्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या विरोधात शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव लोकसभा लढणार आहेत. याच पार्श्वभूमीवर, कुलाबा विधानसभा मतदारसंघात आता यामिनी जाधव यांनी जोरदार प्रचाराला सुरूवात केली. यामिनी जाधव यांनी कुलाबा विधानसभा मतदारसंघात भव्य प्रचार फेरी काढली, त्यावेळी त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचं पहायला मिळालं. नुकतीच मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आणि रोड शो पार पडला. त्यानंतर आता मुंबईतील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पहायला मिळतंय. 

महिला उमेदवाराला संधी 

कुलाबा येथे प्रचार फेरी काढत यामिनी जाधव यांनी मतदारांशी संवाद साधला. त्यांच्या प्रचारफेरीला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा मिळाला. एकेकाळी शिवसेनेत सहकारी असलेले अरविंद सावंत आता मैदानात उभे ठाकले असताना यामिनी जाधव यांनी देखील जोर लावला आहे. भाजप नेत्या जयवंतीबेन मेहता यांच्यानंतर तब्बल 20 वर्षांनी महिला उमेदवाराला या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने आता निवडणुकीचं वारं फिरणार की काय? असा सवाल विचारला जात आहे. दक्षिण मुंबईच्या निवडणुकीत महिला फॅक्टर किती महत्त्वाचा ठरणार? यावर देखील चर्चा होताना दिसतेय.

यामिनी जाधव आणि त्यांचे पती यशवंत जाधव हे दोघेही शिवसेनेत सक्रिय आहेत. शिवसैनिक ते आमदार असा यामिनी जाधव यांचा आत्तापर्यंतचा प्रवास राहिला आहे. 2012 मध्ये यामिनी जाधव नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्यानंतर 2019मध्ये त्यांना शिवसेनेने भायखळ्यातून तिकीट दिलं. एमआयएमच्या वारिस पठाण यांना पराभूत करून त्या आमदार झाल्या होत्या. आता पुन्हा त्यांना शिंदे गटाकडून तिकीट मिळाल्याने ठाकरे गटाला निवडणूक अवघड जाणार का? असा प्रश्न देखील विचारला जातोय.

दक्षिण मुंबईचं राजकीय गणित

स. का. पाटील, जॉर्ज फर्नांडिस, मुरली देवरा अशा दिग्गजांनी दक्षिण मुंबईचं लोकसभेत प्रतिनिधीत्व केलंय. कधीकाळी हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र अलिकडच्या काळात शिवसेनेनं तो काबीज केला. 2009 मध्ये काँग्रेसचे मिलिंद देवरा यांनी मनसेच्या बाळा नांदगांवकरांचा सव्वा लाख मतांनी पराभव केला. 2014 मध्ये मोदी लाटेचा फायदा घेत शिवसेनेचे अरविंद सावंत खासदार झाले. त्यांनी मिलिंद देवरांना हरवलं. 2019 मध्ये देखील याच निकालाची पुनरावृत्ती झाली. विधानसभेचा विचार केला तर शिवसेना ठाकरे गटाचे 2, भाजपचे 2, शिवसेना शिंदे गटाचा 1 आणि काँग्रेसचा 1 आमदार आहे.