Corona : भारत भ्रमणासाठी आलेल्या 'त्या' निवृत्त शिक्षकाला आस मायदेशी परतण्याची

भारतात आले आणि... 

Updated: Apr 7, 2020, 10:00 AM IST
Corona : भारत भ्रमणासाठी आलेल्या 'त्या' निवृत्त शिक्षकाला आस मायदेशी परतण्याची  title=

मुंबई : Coronavirus कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता भारतात तातडीने केंद्राकडून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. लॉकडाऊनही त्यापैकीच एक निर्णय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घेण्यात आलेला हा निर्णय देशहितासाठी फायद्याचा म्हटलं गेलं. पण, यामुळे समाजातील काही घटकांना होणारी अडचणीह त्यांनी नाकारली नाही. सध्याच्या घडीला संपूर्ण देशच लॉकडाऊन असताना आणि वाहतुकीच्या साधनांसाठी कोणतेही पर्याय उपलब्ध नसताना एका परदेशी नागरिकाला त्यांच्या मायदेशी जाण्याचीच आस लागली आहे.

मारिएनो कॅब्रेरो असं नाव असणाऱ्या या निवृत्त शिक्षक असणाऱ्या स्पेनच्या नागरिकाची व्यथा सर्वांपुढे आणत इंडिय़न एक्स्प्रेसने लॉकडाऊनचं वेगळं चित्र समोर ठेवलं आहे. मारिएनो सध्या मुंबईतील वर्सोवा मेट्रो स्थानकानजीक असणाऱ्या सिव्हिल डिफेन्स आंविवली ग्राऊंड येथे उभारण्यात आलेल्या एका कॅम्पमध्ये आसऱ्यास आहेत.

स्पेनच्या उत्तर पश्चिम भागात असणाऱ्या पोंतेवेद्रा या भागातील मुळ रहिवासी असणारे ६८ वर्षीय मारिएनो स्पेनच्या बार्सिलोना येथून ५  डिसेंबर २०१९ ला भारतात आले होते. सुट्टीसाठी भारतात आलेल्या मारिएनो यांना या प्रवासात इतर कोणाचीही साथ नव्हती. सध्या मात्र ते कोरोनामुळे एका अडचणीत सापडले आहेत.

'मी बार्सिलोना ते दुबई आणि दुबई ते मुंबई असा प्रवास केला. डिसेंबर महिन्यात मी भारतात आलो आणि गेल्या चार महिन्यांपासून मी भारतात फिरत होतो. ज्यावेळी विमान उड्डाणं रद्द होणार असल्याचं सांगत मला त्या ठिकाणहून निघण्याचा सल्ला दिला गेला तेव्हा मी राजस्थानमधील उदयपूर येथे होतो. मी बस प्रवास करत उदयपूरहून मुंबईला आलो. २२ मार्चला मी मुंबईत दाखल झालो तेव्हाच घरी परतण्यासाठी म्हणून मी  निघालोही. पण, विमानतळ मात्र तेव्हा बंद झालं होतं. कुठे जावं हेच मला कळत नव्हतं', असं मारिएनो यांनी सांगितलं. 

दोन दिवस विमानतळावर काढल्यानंतर, तेथेच जमिनीवर झोपल्यानंतर त्यांना इथूनही निघावं लागणार असल्याचं सांगण्यात आलं. पुढे एका पोलिसांनीच त्यांना वर्सोवा येथील ठिकाणाची माहिती मिळाली. त्यांनी दिल्लीत असणाऱ्या स्पेनच्या दूतावासाशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, १४ एप्रिलपर्यंत सर्वकाही बंद असणार असल्याचं त्यांना सांगण्यात आलं.

सध्याच्या घडीला ते ज्या शिबीरात वास्तव्यास आहेत तेथे राहण्यापेक्षा विमानतळावर राहणं अधिक सुरक्षित आणि स्वच्छतेच्या दृष्टीनेही पूरक असल्याचं ते म्हणाले. स्पेनमध्ये कोरोनाचं थैमान सुरु असल्याची जाणीव त्यांना असून, कुटुंबीयांची चिंताही त्यांना आहे. मुख्य म्हणजे वर्सोवा येथे असणाऱ्या या शिबीरात ते एकमेव परदेशी प्रवासी आहेत. जिथे त्यांना सर्व सुविधाही पुरवल्या जात आहेत. पण, तरीही आता मात्र त्यांना घरीच परतण्याची एकमेव आस लागून राहिली आहे.

भारतातील स्पेनच्या दूतावासाला त्यांच्याविषयी माहिती देण्यात आली असून, शक्य त्या स्तरापर्यंत त्यांना मदत केली जाणार आहे. युरोपच्या दिशेने जाणाऱ्या कोणत्याही विमानाने तातडीने त्यांना रवाना करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पण, तिथून पुढे त्यांना अपेक्षित स्थळी नेण्याची जबाबदारी ही त्यांच्या कुटुंबाची असेल असं दूतावासाकडून स्पष्ट करण्याच आलं.