मुंबई : मिडडे वर्तमानपत्राचे तत्कालीन शोधपत्रकारिता संपादक ज्योतिर्मय डे अर्थात जे. डे यांच्या हत्याप्रकरणाचा आज (बुधवार) निकाल आहे. छोटा राजनसह ११ आरोपींविरोधात आज निकाल सुनावला जाईल. ७ वर्षांपूर्वी जे डे यांची छोटा राजनच्या गुंडांनी भर दिवसा हत्या केली होती. या प्रकरणात एक महिला पत्रकारही आरोपी आहे. जे डे यांच्या हत्ये दिवशी नेमकं काय घडलं. एक स्पेशल रिपोर्ट...
जे डे हे अंडरवर्ल्डमधल्या घडामोडींचं वार्तांकन करायचे. ११ जून २०११ च्या दिवशी घाटकोपरमध्ये आईची भेट घेऊन जे डे पवईच्या आपल्या फ्लॅटवर जात असताना पवई हिरानंदानी परिसरात बाईकवरून आलेल्या मारेकऱ्यांनी जे डे यांच्यावर गोळीबार केला. ५ गोळ्या जे डे यांच्यावर झाडण्यात आल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. सुरूवातीला तपास मुंबई पोलीस आणि मुंबई क्राईम ब्रँचतर्फे केला जात होता. मात्र छोटा राजनला अटक करून भारतात आणल्यावर हा तपास सीबीआयकडे देण्यात आला. या प्रकरणात एकूण १२ आरोपी आहेत. यातल्या विनोद असरानी उर्फ विनोद चेम्बूरचा मृत्यू झालाय. त्यामुळे ११ आरोपींविरोधात हा खटला सुरू आहे. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार जे डे यांच्या वार्तांकनामुळे छोटा राजन नाराज होता. त्यामुळे राजनच्या सांगण्यावरून सतीश कालिया या गुंडाने जे डे यांच्यावर गोळ्या झाडल्या. यासाठी सतीश कालियाला पाच लाखांची सुपारी देण्यात आली होती. त्यातील २ लाख रूपये अॅडव्हान्स तर ३ लाख रूपये हत्येनंतर देण्यात येणार होते. या प्रकरणात एशियन एज या वृत्तपत्राच्या मुंबई डेप्युटी ब्युरो चीफ आणि महिला पत्रकार जिग्ना व्होरा यांना अटक झाल्यामुळे खळबळ माजली होती. हत्याकांडाआधी व्होरा आणि राजन यांच्या तब्बल ३० हून अधिक वेळा फोनवरून संभाषण झालं. घटनेच्या आधी ३ ते ४ महिन्यांपासून मारेकरी जे डे यांच्यावर लक्ष ठेऊन होते.
हत्येच्या दिवशी सतीश कालिया आणि अरूण डाके यांनी बाईकवरून येऊन जे डेंवर गोळीबार केला. सतीश कालियाने गोळ्या झाडल्या तर अरूण डाके बाईक चालवत होता. दुसऱ्या बाईकवर मंगेश आगवणे आणि अनिल वाघमारे हे दोघे होते. तिसऱ्या बाईकवर अभिजीत शिंदे आणि निलेश शेडगे होते. सचिन गायकवाड आणि इतर आरोपी जीपमध्ये बसून जे डे यांचा पाठलाग करत होते. नैनितालला राहणाऱ्या दीपक सिसोदियाने या हत्याकांडासाठी सतीश कालियाला काडतुसं आणि पिस्तुल दिलं होतं. तर पॉल्सन जोसेफ नावाच्या आरोपीने सतीश कालियाला ग्लोबल रोमिंग कार्ड्स आणि सुपारीचं अॅडव्हान्स पेमेंट म्हणून 2 लाख रूपये दिले होते. या रोमिंग कार्डावरून जिग्ना व्होरा आणि छोटा राजन यांच्यात फोन संभाषण झालं होतं.
या प्रकरणातल्या दोन साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवली. त्यात एका पत्रकाराचाही समावेश आहे. तर पोलिसांना अजूनही दोन आरोपी अटक करता आलेले नाहीत. त्यापैकी रवी रितेश्वर या आरोपीला परदेशात अटक झालीय. मात्र त्याला भारताच्या ताब्यात देण्यात आलेलं नाही तर नयनसिंह बिष्त हा आरोपी अजूनही फरार आहे.