Special Trading Session : देशभरात सध्या सुरु असणारी राजकीय धुमश्चक्री पाहता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या अनेक घटकांवर याचे थेट परिणाम होताना दिसत आहेत. देशातील सर्वसामान्य नागरिकांपासून ते अर्थव्यवस्थेपर्यंत हे परिणाम दिसत आहेत. यामध्ये शेअर बाजारही मागे नाही. एरव्ही शनिवारी आठवडी सुट्टीच्या निमित्तानं शेअर बाजार बंद ठेवण्यात येतो. पण, या राजकीय धामधुमीत मात्र गुंतवणूकदार आणि शेअर बाजरातील दलाल मात्र सक्रिय असल्याचं पाहायला मिळत आहे.
शेअर बाजारात सध्या शनिवारीसुद्धा विशेष ट्रेडिंग सत्र सुरु ठेवण्यात आलं असून, या दिवशी डेरिवेटिव मार्केटमध्येही हे आर्थिक सत्र सुरु आहे. यंदाच्या वर्षातील ही तिसरी वेळ आहे, जिथं सुट्टीच्या दिवशी शेअर बाजार सुरु ठेवण्यात आवला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ही कार्यवाही स्पेशल ट्रेडिंग सेशन डिजास्टर रिकवरी साइट मॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत सुरु राहील. ज्यामुळं अनेकांनाच सुट्टीच्या निमित्तानं ट्रेडिंग करण्यासाठी जास्तीचा वेळही मिळणार आहे हे नाकारता येत नाही.
सेबीनं आखून दिलेल्या नियमांनुसार शेअर बाजारातील हे स्पेशल ट्रेडिंग सेशन पार पडत असून, मुंबईस्थित मुख्यालयाला कोणत्याही संकटसमयी उदभवणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी सज्ज राहणं गरजेचं असून, त्याच धर्तीवर शेअर बाजारातील सर्व कारभार पार पडणार आहेत. दोन भागांमध्ये शनिवारचे व्यवहार होणार असून, पहिलं सत्र सकाळी 9.15 ते 10 वाजेपर्यंत होतं. तर, दुसरं सत्र सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत असेल.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बीएसई (BSE) कडून देण्यत आलेल्या माहितीनुसार कोणत्याही संकटाच्या वेळी या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत शेअर बाजाराच्या या विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन करण्यात येतं. यापूर्वी शनिवार 2 मार्च आणि जानेवारी 20, शनिवार या दिवशीसुद्धा डिजास्टर रिकवरी साइटवरून ट्रेडिंग करण्यात आलं होतं. कोणत्याही अडीअडचणीच्या वेळी आपण सुसज्ज आहोत की नाही, यासंबंधीची क्षमता ओळखण्यासाठी म्हणून शेअर बाजार शनिवारीसुद्धा सुरु ठेवला जात आहे.