कौतुकास्पद! 26/11 मध्ये शहीद झालेल्या तुकाराम ओंबळेंचा असा सन्मान

शहीद असिस्टंट सब इंस्पेक्टर तुकाराम ओंबळे यांचा वेगळ्या पद्धतीने सन्मान करण्यात आला आहे. 

Updated: Jun 28, 2021, 09:14 AM IST
कौतुकास्पद! 26/11 मध्ये शहीद झालेल्या तुकाराम ओंबळेंचा असा सन्मान title=

मुंबई : मुंबईतील 26/11 आतंकवादी हल्ल्यातील हिरो आणि अजमल कसाबला जिवंत पकडण्यात मदत करणारे शहीद असिस्टंट सब इंस्पेक्टर तुकाराम ओंबळे यांचा वेगळ्या पद्धतीने सन्मान करण्यात आला आहे. राज्यात नव्या कोळ्याच्या प्रजातीचा शोध लागलाय. आणि कोळ्याच्या या प्रजातीचं तुकाराम ओंबळे यांच्या नावावरून नामकरण करण्यात आलं आहे.

Icius tukarami असं या कोळ्याच्या प्रजातीचं नाव ठेवण्यात आलं आहे. कोळ्याच्या प्रजातींचा शोध लावणाऱ्या संशोधक टीमनं आपल्या संशोधन पत्रिकेत पहिल्यांदा त्यांचा उल्लेख आइसियस तुकारामी असा केला आहे. 'महाराष्ट्रातील फिंटेला आणि आयकियस या दोन प्रजातींचे वर्णन' या अंतर्गत या संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना संशोधक ध्रुव प्रजापती यांनी सांगितलं की, "आम्ही 26/11च्या मुंबई हल्ल्यातील हिरो सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या नावावरून कोळ्याच्या एका प्रजातीचं नाव ठेवलं आहे. तुकाराम ओंबळे यांनी छातीवर तब्बल 23 गोळ्या झेलत दहशतवादी अजमल कसाबला पकडण्यात मदत केली."

26/11च्या आतंकवाजी हल्ल्यात सीएसटी रेल्वे स्थानकावर झालेल्या गोळीबारानंतर अजमल कसाब आणि त्याचा साथीदार इस्माईल खान यांनी कामा हॉस्पिटलला लक्ष्य केलं होतं. हे दोन्ही दहशतवादी रुग्णालयाच्या मागील दाराजवळ पोहोचले आणि कर्मचार्‍यांनी आतून सर्व दरवाजे बंद केले होते.

या दोघांनी रुग्णालयाबाहेर तैनात असलेल्या पोलिसांवर हल्ला केला, ज्यामध्ये सहा पोलीस ठार झाले. एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे हे देखील यात सहभागी होते. त्यानंतर कसाब आणि इस्माईल खान यांना गिरगाव चौपाटीजवळ थांबवण्यात आलं. त्याठिकाणी तुकाराम ओंबळे छातीवर गोळ्या झेलत कसाबला जिवंत पकडलं. त्यांच्या शौर्यासाठी ओंबळे यांना मरणोत्तर अशोक चक्र या शौर्यपदकाने गौरवण्यात आलं.