देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : गेल्या वर्षी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Strik) संपामुळे चर्चेत आलेले वकील गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी दिवाळीआधीच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची हाक दिली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर जाणार असल्याचे पाहायला मिळत आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वात एसटी कष्टकरी जनसंघातील कर्मचारी उद्यापासून आंदोलन करणार आहेत. सदावर्ते यांची कर्मचाऱ्यांशी संवाद साधतानाची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे.
सातव्या वेतन आयोगासह एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखालील एसटी कष्टकरी जनसंघाने उद्यापासून संपाची हाक दिली आहे. विविध जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांची याबाबत सदावर्ते यांनी बातचीत सुरू केली आहे. या एसटी कर्मचाऱ्यांसोबत संपाबाबत बातचीत करणारी सदावर्ते यांची ऑडिओ क्लिप सध्या समाज माध्यमांमध्ये वायरल झालेली आहे. सदावर्ते यांनी महाविकास आघाडी सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणी संदर्भात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले होते. मात्र एसटी विलिनीकरणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे ज्यांचे सत्ताधाऱ्यांबरोबर साठे लोटे आहे त्यांनी एसटी महामंडळाला जाब विचारण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांना जाब विचारून एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावे उगाचच स्टंटबाजी करू नये अशी टीका इतर एसटी कर्मचारी संघटनांनी केलेली आहे.
सदावर्ते यांच्या ऑडिओ क्लिपमधील संभाषण
"शक्ती दाखवा, डेपोला सहा तारखेच्या बंद बाबत कळवा. तुम्ही हे करा मग बघा मी सहा तारखेची सकाळ कशी करतो. तुम्ही हे केलं नाही तर मी काही करू शकत नाही सर्व केंद्रीय कार्यकारणीला सांगतो. डंके की चोट वर सांगतो. आपल्याला एकत्र राहायचं आहे. लॉग शीट मला द्या मला त्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवायच्या आहेत," असे ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, झी 24 तास या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
दुसरीकडे, सदावर्ते यांच्या संपाबाबतच्या भूमिकेबाबत इतर कामगार संघटनांनी जोरदार टीका केली आहे. एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सदावर्ते यांच्यावर निशाणा साधला आहे. "एसटी कष्टकरी जनसंघाचे अध्यक्ष गुण रत्न सदावर्ते एसटी कामगारांना पुन्हा संपाबाबत चिथावणी देत असले तरी एसटी कर्मचारी हे त्यांच्या भूलथापांना बळी पडत नाहीयेत. एसटी कर्मचाऱ्यांची कुठलीही संपाची मानसिकता नाहीये. मात्र अस असताना ज्यांचे सत्ताधाऱ्यांबरोबर साटेलोटे आहेत ज्यांनी एसटी विलीनीकरणाच्या संदर्भात मागे आकांड तांडव केला होता त्यांनी एसटी विलिनीकरणा संदर्भात सत्ताधाऱ्यांना जाब विचारला पाहिजे. फक्त स्टंटबाजी करू नये," असे श्रीरंग बरगे यांनी म्हटलं आहे.