अटल सेतू टोलसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, यापुढे एक वर्ष...

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) म्हणजेच अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबईतील अंतर कमी झालं आहे. मात्र अटल सेतूवरील टोल रकमेमुळे त्याला कमी प्रतिसाद मिळत असताना राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 28, 2025, 01:49 PM IST
अटल सेतू टोलसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, यापुढे एक वर्ष... title=

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) म्हणजेच अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबईतील अंतर कमी झालं आहे. समुद्रावर उभारण्यात आलेला हा भारतातील सर्वात लांब पूल आहे. तब्बल सात वर्षं या पूलाचं काम सुरु होतं. कोविडमुळे रखडलेल्या या पुलाचं अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जानेवारी 2024 मध्ये उद्घाटन करण्यात आलं. या पुलामुळे मुंबई ते नवी मुंबई अंतर दोन तासांवरुन 20 मिनिटांवर आलं आहे. मात्र या पुलावर आकारण्यात येणारा टोल खूप जास्त असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. यामुळे त्याला मिळणारा प्रतिसादही कमी झाला होता. त्यातच आता राज्य मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. 

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. यावेळी अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटलसेतूसाठी पथकर आणखी एक वर्षासाठी 250 रुपये इतकाच कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अटल सेतूवर एका प्रवासासाठी 250 आणि परतीच्या प्रवासासाठी 375 रुपये इतका टोल आकारला जातो. 

हा पूल 21.8 किमी लांबीचा आहे. पुलाचा 16.5 किलोमीटर भाग पाण्यावर उभारण्यात आला आहे. तर 5.5 किलोमीटर भाग जमिनीवर आहे. अटल सेतुवर सहा मार्गिका आहेत. हा पूल उभारण्यासाठी 17 हजार 840 कोटी रुपये खर्च आला. त्यासाठी 1 लाख 77 हजार 903 मेट्रिक टन स्टील आणि 5 लाख 4 हजार 253 मेट्रिक टन सिमेंट वापरण्यात आलं. हा पूल 100 वर्ष टिकेल असा कंपनीचा दावा आहे. कार, टॅक्सी, कमी वजनाची वाहनं, मिनी बस, टू एक्सल बस, लहान ट्रक याच वाहनांना पुलावरुन प्रवास करण्याची परवानगी आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x