अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नऊ सीटर स्कूल व्हॅनमध्ये (school van) चक्क 31 विद्यार्थ्यांना (Student) कोंबून बसवल्याचं धक्कादायक वास्तव नागपुरात (Nagpur) पुढे आलं आहे. या स्कूल व्हॅनवर आरटीओने (RTO) कारवाई करत जप्त केली आहे. शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवासाची जबाबदारी असणारे स्कूल व्हॅन चालक विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात टाकून हा धोकादायक प्रवास करत असल्याचे चित्र यामुळे पुन्हा दिसून आलं.
शालेय विद्यार्थ्यांचा सुरक्षित प्रवासासाठी स्कूल व्हॅन आणि बससाठी कठोर नियम आहेत. मात्र तरीही या सर्व नियमांना धुडकावून अनेक स्कूल बसचालक आणि व्हॅनचालक विद्यार्थ्यांना कोंबून क्षमतेपेक्षा खूप जास्त विद्यार्थ्यांना घेऊन जात असल्याचा धोकादायक चित्र वारंवार समोर येत आहे. नागपूर आरटीओकडून जिल्ह्यातील खाजगी ट्रॅव्हल्स आणि प्रवासी वाहनांची तपासणी मोहीम ऑटोमोटिव्ह चौकात बुधवारी सुरू होती. या अभियानांतर्गत कामठी मार्गावरून एक शालेय वाहन विद्यार्थ्यांना कोंबलेल्या अवस्थेत घेऊन जात असल्याचे आरटीओ पथकाला दिसून आलं.
अविनाश पब्लिक स्कूलची ही स्कूल व्हॅन होती. आरटीओच्या कारवाईमुळे व्हॅन मधील मुलं घाबरू नये म्हणून काळजी म्हणून आरटीओ निरीक्षक वीरसेन ढवळे आणि मोटार वाहन निरीक्षक सुरज मून यांनी स्कूल चालकाला व्हॅन शाळेत नेण्यास सांगितले आणि त्याच्यामागे आपले वाहन ठेवले शाळेत पोहोचल्यानंतर तिथे सगळ्या मुलांना व्हॅनमधून हळूहळू उतरण्यास सांगितलं.
नऊ जणांची आसनक्षमता असलेल्या या स्कूल व्हॅनमधून तब्बल 31 शालेय विद्यार्थी बसले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर आरटीओ अधिकाऱ्यांनी ही स्कूल व्हॅन आरटीओ कार्यालयात जप्त करून ठेवली आहे. याबाबत माहिती देताना आरटीओ कर्मचारी वीरसेन ढवळे यांनी स्कूल व्हॅनच्या आसनक्षमतेत जास्त विद्यार्थी बसवण्याच्या दृष्टीने बदल करण्यात आल्याचे ही दिसून आल्याचे सांगितले .त्याचबरोबर व्हॅनचे फिटनेस सर्टिफिकेट आणि आवश्यक कागदपत्रांची मुदती संपलेली होती. रिजवान अहमद या व्यक्तीच्या नावावर ही स्कूल व्हॅन असल्याची माहिती आरटीओ निरीक्षक ढवळे यांनी दिली.