उत्तर प्रदेशातील आमदार थेट मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात, निरुपमांची डोकेदुखी वाढली

मुंबईतून उत्तर प्रदेशातील आमदार लढवणार निवडणूक

Updated: Apr 16, 2019, 06:26 PM IST
उत्तर प्रदेशातील आमदार थेट मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात, निरुपमांची डोकेदुखी वाढली title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : उत्तर प्रदेशातील एक आमदार मुंबईतल्या काँग्रेस उमेदवाराची राजकीय गणितं बिघडवतो आहे. मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून लढत असलेल्या काँग्रेसच्या संजय निरूपम यांच्यासाठी सध्या शिवसेनेचे उमेदवार गजानन किर्तीकरांपेक्षा समाजवादी पार्टीचे उमेदवार सुभाष पासी अधिक डोकेदुखी ठरत आहेत. सुभाष पासी हे उत्तर प्रदेशातील गाझीपूरच्या सैदपूरमधून दुस-यांदा निवडून आलेले सपाचे आमदार आहेत. आणि आता मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील सपाचे उमेदवार आहेत.

लहानपणापासून मुंबईतच राहणा-या सुभाष पासी यांचा इथल्या उत्तर भारतीयांमध्ये चांगला दबदबा आहे. त्यामुळं सुमारे पावणे चार लाख उत्तर भारतीय मतदारांवर भरवसा ठेवून इथून लढणा-या काँग्रेसच्या संजय निरूपम यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. त्यातच ते संजय निरूपम हे युपीचे नव्हे तर बिहारी असल्याचं सांगत थेट इथल्या युपीवाल्यांना साद घालत आहेत.

उत्तर भारतीय आणि मुस्लिमांबरोबरच बसपासोबतच्या युतीमुळं दलित मतही खेचण्याच्या प्रयत्नात सुभाष पासे इथं आहेत. या मतविभागणीचा तोटा संजय निरूपम यांना होणार आणि फायदा शिवसेनेच्या गजानन किर्तीकर यांना होणार हे निश्चित. सुभाष पासेंची 'सायकल' कितपत चालते यावरच निरूपम आणि किर्तीकर यांच्या जय पराजयाची गणितं अवलंबून आहेत.