Success Story: पाणीपुरी हा समस्त भारतीयांचा विक पॉइंट आहे. मुंबईच्या चौपाटीवरील पाणीपुरी असो किंवा वृंदावनमधील गोपगप्पे. भारतात वेगवेगळ्या नावाने पाणीपुरी प्रसिद्ध आहे. आज शहरातील प्रत्येक गल्लोगल्लीत पाणीपुरीचे ठेले लागलेले दिसतील. पण पाणीपुरीची गाडी चालवणे हा काही कोणाचा ड्रिम जॉब अशू शकत नाही. पण मुंबईतच्या एका व्यक्तीने याच व्यवसायाच्या आधारे मोठे यश मिळवले आहे. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, अरुण जोशी यांचे मुंबईत दोन घरे आहेत. तर, त्यांचा एक मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला आहे. केवळ पाणीपुरीच्या व्यवसायाच्या आधारे त्यांनी मुंबईत आपले बस्तान बसवले आहे. जोशी यांची ही कहाणी अनेकांना प्रेरित करणारी आहे.
अरुण जोशी सांगतात की, पाणीपुरी स्टॉलवर 5 रुपयांपासून मजुरी सुरू केली होती. तिथपासून ते आत्तापर्यंत त्यांना मोठे यश मिळाले आहे. संगीतकार आर.डी बर्मनदेखील त्यांच्याकडील पाणीपुरी खाण्यासाठी येत असत, अशी ते आठवण सांगतात. जोशी यांचे वडिल 60 च्या दशकात मुंबईत आले होते. तेव्हा त्यांनी पाणीपुरीचा स्टॉल लावला होता.या काळात त्यांच्या वडिलांना अनेक संघर्षांचा सामना करावा लागला होता. तरीही त्यांनी न डमगमता खंबीरपणे उभं राहत आमचे पालनपोषण केले. पाणीपुरीचा स्टॉल ते दुकान खरेदीकरण्यापर्यंतचा संघर्ष आमच्या वडिलांनी केला. त्यांच्यामुळंच माझ्या बहिण-भावांना आणि मला अधिक संघर्ष करावा लागला नाही, असं ते म्हणतात.
अरुण जोशी त्यांच्या वडिलांचा व्यवसाय पुढे घेऊन जाण्याच्या तयारीत असतानाच त्यांचे वडिल आजारी पडले. त्यांच्या उपचारांसाठी आत्तापर्यंत बचत केलेले 60,000 रुपये त्यांच्याच उपचारांसाठी खर्च झाले. त्यामुळं घरखर्च चालवण्यासाठी त्यांनी एका भेलपुरीच्या दुकानात काम केले. चार वर्ष कठोर मेहनत केल्यानंतर जोशी कुटुंबाकडे पुन्हा एकदा आनंदाचे दिवस आले. त्यांच्या वडिलांच्या प्रकृतीत थोडी थोडी सुधारणा दिसून आली आणि त्यांनी पुन्हा एकदा पाणीपुरीचा स्टॉल लावण्यास सुरुवात केली.
अरुण जोशी यांनी त्यांच्या व्यवसायात आणखी नव नवीन आयडिया शोधण्यास सुरुवात केली होती. त्यांनी कॅटरिंगचा व्यवसाय सुरू केला. पाणीपुरीच्या स्टॉलवरही नवीन मेन्यू अॅड केले. हळूहळू लोकांना त्यांचे पदार्थ पसंत पडू लागले.कलाकारही त्यांच्या दुकानात येऊ लागले. आर.डी. बर्मन तर त्यांचे रोजचे ठरलेले गिऱ्हाईक झाले. पाणीपुरीच्या व्यवसायात जम बसल्यानंतर त्यांनी कॅटरिंगचा व्यवसाय सुरू केला.
2012मध्ये अरुण यांनी त्यांचे पहिले घर खरेदी केले. जोशी म्हणतात की, या काळात मी हेच शिकलो की कोणतेही काम लहान -मोठे नसते. तुम्हाला यश मिळवण्यासाठी चांगल्या नोकरीची गरज नसते तर काम चांगलं असावं लागते. आज अरुण जोशी यांच्याकडे दोन फ्लॅट आहेत आणि त्यांची मुलंदेखील चांगल्या ठिकाणी सेटल आहेत. एक मुलगा तर अमेरिकेत स्थायिक झाला आहे.