मुंबई : जसलोक रूग्णालयामध्ये एका दोन वर्षांच्या बालकावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण म्हणजेच लिव्हर ट्रांन्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली. यकृताचा कँन्सर झालेल्या बालकाला त्याच्या वडिलांनीच यकृत दान केले आहे.
एक वर्षाचा असतानाच प्रणवला हिपँटोब्लास्टोमा लिव्हर कँन्सरचे निदान झाले. हा आजार अंत्यत दुर्मिळ असून दहा लाख बालकांमध्ये एखाद्या बालकाला हा आजार होतो. तीन वर्षांच्या आतील बालकांना जेनेटीक बदलामुळं हा आजार होतो. दिवस भरण्यापूर्वीच कमी वजनाच्या बाळाचा जन्म, शरीराच्या एकाच बाजूची वाढ होणे, पोट सुजणे, पोटात दुखणे, त्वचेला खाज सुटणे, निस्तेज त्वचा,डोळे पिवळसर होणे, भूक न लागणे. ही या आजाराची लक्षणे आहेत.
प्रणवला हा कॅन्सर झाल्यानंतर तो दीड वर्षांचा असताना त्याचे लिव्हर काढावे लागले. त्याच्या वडिलांनी स्वत;चे 30 टक्के लिव्हर मुलाला दान केल्यानंतर प्रणववर लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली. लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी सर्जन डॉ. ए. एस. सोईन ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.
लिव्हर दान केल्यानंतर दोन ते तीन महिन्यांत पुन्हा लिव्हरची वाढ होते. त्यामुळं दात्याला कुठलाही त्रास होत नाही. लिव्हर दान करणारा दाता हा रुग्णाच्या कुटुंबातील असणे आवश्यक असते. तसंच रुग्ण आणि दात्याचा रक्तगट एकच असावा लागतो. दात्याचे वय हे १८ ते ५५ वर्षे इतके असावे लागते. तसंच तो दाता जादा वजनदार असून चालत नाही.