डायबेटीजसाठी शुगर फ्रीचा अतिरेक धोकादायक

भारत बनली मधुमेहाची राजधानी...

Updated: Nov 14, 2019, 02:00 PM IST
डायबेटीजसाठी शुगर फ्रीचा अतिरेक धोकादायक title=
संग्रहित फोटो

मुंबई : आज १४ नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन आहे. भारतात ६ कोटींहून अधिक रूग्ण डायबेटीजग्रस्त आहेत. मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी आज मार्केटमध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी एक पर्याय म्हणजे, शुगर फ्री...पण हा पर्याय धोकादायक आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगात ४२ कोटी मधुमेह रुग्ण असून, एकट्या भारतात ६.२ कोटी इतके डायबेटीज रूग्ण आहेत. डायबेटीज होण्याची अनेक कारण आहेत. मात्र, कॅलरीज् अतिसेवन आणि व्यायामाचा अभाव हे प्रामुख्याने कारण आपल्याला पहायला मिळतं. कॅलरी कमी करण्यासाठी शुगर फ्री खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे, मार्केटमध्येही शुगर फ्री मिठाई, आईस्क्रिमसारखे वेगवेगळे पदार्थ सर्रास विक्रीसाठी ठेवले जातात. 

डॉक्टरांकडून साखर पूर्णपणे बंद करण्याचा सल्ला दिला जातो मात्र, त्यालाही आता शुगर फ्रीची जोड मिळाल्याने मधुमेहींसाठी नवे पर्याय उपलब्ध झालेत. हा पर्याय चांगला नसल्याचा सल्ला डॉक्टर देतायेत. शुगर फ्रीच्या वापरामुळे स्थूलता आणि हृदयाचे आजारही उद्भवण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

मार्केटमध्ये डायबेटीजच्या नावाखाली सर्रास शुगर फ्री पदार्थ विकले जातात. त्यामुळे, याचे फायदे होण्यापेक्षा नुकसानच होताना दिसत आहे. लहान मुलांना तर, साखरेपासून दूर ठेवावं असा सल्लाही डॉक्टर देत आहेत.

  

डायबेटीज सारख्या आजाराला रोखण्यासाठी आज मार्केटमध्ये वेगवेगळी प्रलोभनं दाखवली जात असली तरी, त्या प्रलोभनापेक्षा योग्य आहार, व्यायाम, वेळोवेळी तपासण्या आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला तर नक्कीच भारत डायबेटीज मुक्त जीवन जगू शकतो.