निविदामध्ये गैरव्यवहार, सुनील प्रभूंचा शिवसेनेला घरचा आहेर

मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागात निविदा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप 

Updated: Feb 13, 2019, 06:37 PM IST
निविदामध्ये गैरव्यवहार, सुनील प्रभूंचा शिवसेनेला घरचा आहेर

मुंबई : शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे. मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागात निविदा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिवसेना आमदार आणि माजी महापौर सुनील प्रभू यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहून निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे. पालिका क्षेत्रातील झाडांच्या फांद्या छाटण्याच्या कामासाठी ५० कोटींहून अधिक किंमतीची निविदा मागवण्यात आली. जुन्याच कंत्राटदारांना काम मिळावे, यासाठी कठोर अटी घातल्या असून कंत्राटदार आणि उद्यान विभागातील वरिष्ठ अधिका-यांचे साटेलोटे असल्याचा थेट आरोप सुनील प्रभूंनी केला आहे. 

याप्रकरणी अधिका-यांच्या दालनाचे सीसीटीव्ही, मोबाईल कॉल रेकॉर्डची तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. रस्ते गैरव्यवहारातही असाच प्रकार झाल्याचे पत्रात नमूद करण्यात आलं आहे. तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी रस्ते कामातील गैरव्यवहार प्रकरणी पत्र लिहले होते. त्यानंतर आता आमदार आणि माजी महापौरांचे हे पत्र समोर आलं आहे.